नांदेड, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : नांदेड शहरातील नवीन मोंढा व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेशाची भक्तिमय आरती, महाप्रसाद तसेच सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला व्यापारी बांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण तथा शिक्षण समितीच्या सभापती सौ. सदिच्छा वैजू सोनी-पाटील, वैजू सोनी यांच्यासह नवीन मोंढ्यातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते. राठी सेठ, अग्रवाल सेठ यांच्यासह व्यापारी मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतला. यावेळी प्रभाग क्रमांक ९च्या नगरसेविका तथा सभापती सौ. सदिच्छा सोनी-पाटील यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक संदेश दिला. त्यांच्या रक्तदानामुळे उपस्थित व्यापारी व नागरिकांमध्येही रक्तदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धेबरोबरच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न नवीन मोंढा व्यापारी मित्र मंडळाने केला. रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकते, त्यामुळे अशा उपक्रमांना समाजातील विविध घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


