निगडी, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : टाटा मोटर्सच्या CSR उपक्रमांतर्गत समाजसेवेच्या भावनेतून विंगर परिवार व आधार समाजसेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण नगरी वृद्धाश्रम प्राधिकरण, निगडी येथील वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना विंगर विभागाचे कुटुंब प्रमुख संजयजी वाकचौरे म्हणाले की, “टाटा मोटर्स केवळ वाहने तयार करीत नाही, तर समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना सातत्याने मदत करण्याचे कार्यही करते.” यावेळी विंगर परिवार व आधार समाजसेवा संस्थेच्या वतीने वृद्धाश्रमाला किराणा साहित्य, वॉशिंग मशीन, डायपर, टॉवेल यासह विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. वृद्धाश्रमाच्या कार्याची माहिती संस्थापिका रश्मी झेंडे यांनी दिली, तर आधार समाजसेवा संस्थेच्या कार्याची माहिती पुरुषोत्तम बाबर यांनी दिली. समाजसेवेच्या या उपक्रमामागील भावना स्पष्ट करताना संत तुकाराम महाराजांच्या, “जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोचि साधू ओळखावा । देव तेथीची जाणावा ।” या अभंगातील विचारांचा संदर्भ देण्यात आला. समाजातील दुःखी, पीडित आणि गरजू व्यक्तींना आधार देणे हाच समाजसेवेचा मूल उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला कुटुंब प्रमुख संजयजी वाकचौरे, वरिष्ठ अधिकारी मनोजजी गाडगे, धनंजय शहाणे, नरेंद्र सिंग, सुनील कासार, संतोष गाडे, रविंद्र लामसे, अरबाज तांबोळी, श्रृतीका साळवे, अमेय सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन अनिल तळेकर, सतीश काळभोर, किरण बोरगे व पुरुषोत्तम बाबर यांनी केले. प्रास्ताविक सुनील कासार यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद मराठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महंमदशरीफ मुलाणी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन कोरडे, रघुनाथ फेगडे, धनंजय साळुंके, चंद्रकांत पवार, आण्णा नलवडे, धन्नप्पा पथ्थार, अविनाश आवटे, विष्णू शिंदे व किशोर जैन यांनी सहकार्य केले.


