अमरावती, राज माहोरे ( जिल्हा प्रमुख ) : भारतीय अध्यात्म, संस्कृती, परंपरा आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच देशव्यापी स्तरावर ‘इंटरनॅशनल स्पिरिच्युअॅलिटी ऑलिम्पियाड (ISO) २०२६-२७’ आयोजित करण्यात येत आहे. इंटरनॅशनल स्पिरिच्युअॅलिटी ऑलिम्पियाड कौन्सिलतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून देशातील सुमारे २०० निवडक जिल्ह्यांमध्ये या स्पर्धेची परीक्षा होणार आहे. सध्या देशभर नोंदणी प्रक्रिया सुरू असून विद्यार्थी, युवक तसेच पालकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
अध्यात्म, तत्त्वज्ञान, संस्कार आणि भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्र, रामायण, भगवद्गीता, ऋषी परंपरा, संत परंपरा, जैन, बौद्ध, शीख आदी विविध भारतीय विचारप्रवाहांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच जागतिक तत्त्वज्ञान आणि इतर मत-पंथांवर आधारित स्वतंत्र विभागही समाविष्ट करण्यात आला आहे. स्पर्धेसाठी ग्रुप C, D, E1, E2 आणि F असे पाच गट तयार करण्यात आले आहेत. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, पदवी, पदव्युत्तर, संशोधन व डिप्लोमा अभ्यासक्रमातील विद्यार्थी यांना सहभाग घेता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी स्वतंत्र ‘ग्रुप F’ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला अध्यात्म आणि संस्कृतीच्या अभ्यासात सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
ISO प्रिलिम्स परीक्षा २९ ऑगस्ट २०२७ रोजी देशातील ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे २०० जिल्ह्यांत एकाच दिवशी ऑफलाइन पद्धतीने (OMR आधारित) घेतली जाणार आहे. परीक्षा हिंदी व इंग्रजी माध्यमात होईल. नोंदणीकृत स्पर्धकांना अभ्यासासाठी विशेष पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यातील वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरांच्या आधारे परीक्षा घेतली जाईल.
विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १० लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ५ लाख रुपये, तृतीय क्रमांकाला २.५ लाख रुपये, चतुर्थ क्रमांकाला २ लाख रुपये आणि पाचव्या क्रमांकाला १.५ लाख रुपये रोख पुरस्कार दिला जाणार आहे. सर्व गटांतील बक्षिसांची एकूण रक्कम जवळपास ३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ३० सप्टेंबर २०२७ रोजी प्रिलिम्सचा निकाल जाहीर होणार असून राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतून निवड झालेल्या एकूण ४८० स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी दिल्ली येथे आमंत्रित करण्यात येणार आहे. अंतिम परीक्षा डिसेंबर २०२७ मध्ये होणार असून त्यानंतर पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जाणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच परीक्षा होणाऱ्या २०० जिल्ह्यांतील उत्कृष्ट स्पर्धक आणि शिक्षण संस्थांनाही ट्रॉफी व पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या प्रचार व मार्गदर्शनासाठी विविध आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी पाठिंबा दर्शविला आहे. महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष चंद्रकुमार जाजोदिया (लप्पी भैय्या) यांनी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ISO कौन्सिलच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.


