चंद्रपूर, गौरव पराते ( जिल्हा प्रमुख) : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ अंतर्गत आयोजित १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. शाळेच्या तीन खेळाडूंनी अव्वल पाचमध्ये स्थान मिळवत विभागीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
इयत्ता दहावीचा विद्यार्थी सार्थ बुजाडे याने अंतिम फेरीत माउंट कार्मेल स्कूलच्या खेळाडूचा पराभव करून जिल्हा विजेतेपद पटकावले. इयत्ता नववीतील सुयोग गुल्हाने याने तिसरे, तर इयत्ता दहावीतील संग्राम चव्हाण याने पाचवे स्थान मिळवले. या कामगिरीमुळे तिन्ही खेळाडूंची आगामी विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. शाळेच्या क्रीडा शिक्षिका रेशमा पठाण आणि क्रीडा शिक्षक विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले.
या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि चंद्रपूर जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. दि एजुकेशन एंड कल्चरल सोसाइटीचे अध्यक्ष तथा माजी खासदार नरेश पुगल्या, व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तसेच मुख्याध्यापिका श्रीमती सीमा एम. जोसेफ यांनी खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही युवा बुद्धिबळपटूंच्या यशाचे कौतुक केले.


