अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची साडेसातशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा

नगरच्या कोके पाटलांकडे सापडले मोडी लिपीतील जुने दस्तावेज; 1260 सालच्या कागदपत्रांत मंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे

अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : शहराचे ग्रामदैवत व अवघ्या नगरकरांचे आराध्यदैवत असलेल्या माळीवाड्यातील श्री विशाल गणपतीची साडेसातशे ते आठशे वर्षांपूर्वीची ऐतिहासिक परंपरा असल्याचा दस्तऐवज उपलब्ध झाला आहे. बाराव्या शतकातील त्याच्या अस्तित्वाचे पुरावे मोडी लिपीत मिळाले असून, नगरमधील उद्योजक व हॉटेल व्यावसायिक विनायक नामदेवराव कोके पाटील यांच्याकडे हे दस्तावेज उपलब्ध आहेत. 1490 मध्ये नगर शहराची स्थापना झाल्याचे सांगितले जाते; मात्र त्याही आधी सुमारे दोन-अडीचशे वर्षांपासून माळीवाड्यात विशाल गणेश भाविकांना दर्शन देत असल्याचे या दस्तावेजांवरून समोर येत आहे.

नगरच्या माळीवाडा परिसरातील कोके पाटील घराण्याचा इतिहास सुमारे 830 वर्षांचा आहे. 1191 पासूनच्या या घराण्याच्या इतिहासाची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मोडी लिपीतील या माहितीचा शोध घेताना विनायक नामदेवराव कोके पाटील यांना घरात आणखी काही जुनी कागदपत्रे सापडली. मोडी लिपीतील या कागदपत्रांचे त्यांनी नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातील मोडी लिपी वाचक नारायण आव्हाड यांच्याकडून देवनागरीमध्ये लिप्यंतर करून घेतले. त्यानंतर त्यांना श्री विशाल गणेश मंदिराच्या अस्तित्वाची 1260 सालातील कागदपत्रे आढळली. त्यात देवाची पूजा-अर्चा, देवाची जमीन, खर्च-उत्पन्न अशी माहिती आहे.

या कागदपत्रांत श्री विशाल गणेशाची स्थापना कोणी केली, त्याचे विशाल रूप कसे झाले, याबाबत माहिती नाही. मात्र, या दस्तावेजांमुळे नगरच्या श्री विशाल गणेशाचा इतिहास तब्बल 761 वर्षे जुना असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे इतिहास व धार्मिक अभ्यासकांनी हा इतिहास अधिक खोलात जाऊन शोधण्याची गरज आहे. जुन्या पोथ्या-पुराणांमध्ये नगरच्या विशाल गणेशाचा उल्लेख आहे की नाही, याचाही नव्याने अभ्यास करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताळीकेनगर… होते नाव

विशाल गणेश मंदिरासंदर्भातील कागदपत्रांमध्ये हजरी बुकातील रोज नंबर 177 मध्ये ‘ताळीके नगर, मौजे माळीवाडा तर्फ नगर हवेली’ असा उल्लेख आहे. सन 1260 फसली सालचे हिशेबास जमीन दाखल असल्याचे नमूद आहे. श्री गणपती वहिवाटदार धोडो भवानी याचे पुजारी तर्फे भगवंत भट बीन मनभट यांच्याकडे 10 बिघे जमीन असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही कैफियत 8 मार्च 1854 रोजी भगवंत कारकून मामले यांनी लिहिली असून, यात भगवंत भट, बापाचे नाव मन भट, आजोबांचे नाव राघोभट, आडनाव पाटक असा उल्लेख आहे. मांडवगणकर जात देशस्थ ब्राह्मण, कसब पुजारीपणाचे व भिक्षुकीचे, उमर अंदाजे 30 वर्षे अशी नोंदही करण्यात आली आहे.

आमच्याकडे इनाम जमीन गणपती देवाबद्दल 10 बिघे चालत आलेली असून, याबद्दल सरकारास पट्टी द्यायची नाही. ही जमीन मुघली सरकार खालसातून कोणी दिली, कधी दिली याची माहिती नाही, जमिनीचा मूळ संपादक कोण हे माहीत नाही, असा उल्लेख दस्तावेजात आहे. सदर देवाची चाकरी, पूजा, दिवाबत्ती, नैवेद्य, झाडलोट, डागडुजी करून इनामची वहिवाट करीत असल्याचेही नमूद आहे. 1227 फसली साली माजी अमल दूर झाला तेव्हा सदर जमिनीची वहिवाट आमचे बाप मन भट बीन राधो भट करीत होते, तो मूळ संपादकाचा कोणी होता की नाही, याची माहिती नाही, असाही उल्लेख आहे. त्यामुळे विशाल गणेश मंदिर 794 वर्षांपूर्वीचे असावे, असेही स्पष्ट होते.

कंपनी सरकारची जप्ती नाही

1227 फसली सालापासून कंपनी सरकारचा अमल सुरू झाला; मात्र जप्ती वगैरे अडचण झाली नाही, असे दस्तावेजात नमूद आहे. सदर जमिनीची लागवड वजा जाता दरसाल उत्पन्न अंदाजे 6 रुपये असून, सरकारास काही द्यायचे नाही. उर्वरित नफा देवाकडे खर्च करीत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 15 कलमांचा हा दस्तावेज पुरुषोत्तम गोविंद हुजूर कारकून, भगवंत कारकून मामलेदार आणि तपास रामचंद्र बाबूराव कारकून यांनी 19 मे 1854 रोजी लिहून घेतल्याचे नमूद आहे. यात कैफियत देणारे भगवंत भट यांच्या वंशावळीचाही उल्लेख आहे.

नगरच्या श्री विशाल गणेशासंदर्भातील जुने मोडी लिपीतील दस्तावेज विनायक कोके पाटील यांना सापडल्यानंतर त्यांनी त्यांचे भाषांतर करून घेतले. त्यातून श्री विशाल गणेशाच्या सुमारे 700 ते 800 वर्षांपूर्वीपासूनच्या अस्तित्वाची साक्ष मिळत आहे. नगर शहराची स्थापना अहमद निजामशहा याने 1490 मध्ये केल्याचे सांगितले जाते. मात्र, या कागदपत्रांनुसार शहर स्थापनेच्या इतिहासाच्या आधीपासूनच विशाल गणेश नगरमध्ये असल्याचे स्पष्ट होत आहे.

या पार्श्वभूमीवर मोडी लिपीतील मूळ कागदपत्रे व भाषांतरित कागदपत्रे विनायक कोके पाटील गणेशोत्सव काळात श्री विशाल गणेश मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्याकडे विधिवत सुपूर्द करणार आहेत. श्री विशाल गणेश भाविक व इतिहास अभ्यासकांना मोडी लिपीतील ही कागदपत्रे पाहण्यासाठी उपलब्ध असून, इच्छुकांनी वाडियापार्क येथे विनायक कोके पाटील (फोन नंबर-9922663493) व प्रसाद कोके पाटील (फोन नंबर-9922141001) यांच्याशी संपर्क साधावा.

नाथपंथीय परंपरा शतक महोत्सवी

श्री विशाल गणेशाची नाथपंथीय पूजापरंपरा सुमारे 100 वर्षांपूर्वीपासूनची असावी, असे मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांनी सांगितले. आमचे गुरू (स्व.) गेंडानाथ महाराजांच्या आधीपासून चालत आलेली ही परंपरा आजही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. आमच्या नाथ परंपरेनुसार गणपती हा नवनाथांपैकी सहावा नाथ आहे. त्यामुळे नाथपंथीय मंत्रोच्चारानुसार रोज सकाळी व संध्याकाळी श्री विशाल गणरायाची पूजा केली जाते. त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनेही पूजा-आरती होते.

ओंकार आदिनाथ, उदयनाथ पार्वती, सतनाथ ब्रह्मा, संतोषनाथ विष्णू, अचेले अचंबे नागनाथ, गजभेली गजकंथडनाथ म्हणजे गणपती, ग्यानपारखी सिद्धचंद्रमा चौरंगीनाथ, मायास्वरूपी दादा मच्छिंद्रनाथ व ज्योतीस्वरूपी गुरु गोरक्षनाथ असे नऊ नाथ आमच्या नाथ परंपरेत आहेत. यानुसार श्री विशाल गणेशाची आराधना केली जाते. या विशाल गणेश मूर्तीच्या खाली नाथसंप्रदायाची समाधीही आहे. जागृत देवस्थान म्हणून श्री विशाल गणेश प्रसिद्ध असून, त्याची प्रचिती भाविकांना नेहमी येते, असेही संगमनाथ महाराजांनी सांगितले.

आत्मलिंगधारण करणारा

नगरचा श्री विशाल गणेश सव्वा अकरा फूट उंच व सुमारे सात फूट रुंद आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची 75 फूट आहे. पूर्वाभिमुखी, चतुर्भुज तसेच उजव्या सोंडेचा असलेल्या या गणपतीने बेंबीत आत्मलिंग व त्यावर नागफणी धारण केलेली आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या डाव्या हातात मोदक असून, उर्वरित तीनही हात आशीर्वाद स्थितीत आहेत. एकाच वेळी तीन हातांनी आशीर्वाद देणारी दुर्मिळ मूर्ती अन्य कोठेही पाहण्यास मिळणे अवघड आहे. श्रींची मूर्ती कणाकणाने वाढत जात होती, म्हणून डोक्यावर त्रिशूळ ठोकण्याचे कुणातरी भक्ताच्या स्वप्नात सांगितले गेल्याने या मूर्तीच्या डोक्यावर त्रिशूळ आहे. मंदिरात त्रिकाल कडक पूजा-अर्चा होते. रोज रात्री पावणे आठ ते साडेआठ या दरम्यान होणारी नाथपंथीय आरती व त्यावेळी वाजविल्या जाणाऱ्या वाद्यांचा वैशिष्ट्यपूर्ण ताल व सूर उपस्थित भाविकांच्या अंगावर रोमांच उभा करणारा असतो.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

महाराष्ट्रात FDAची धडक कारवाई; 12 लाखांचा गुटखा जप्त, 14 होटल-रेस्तरां के लाइसेंस निलंबित

त्योहारों का मौसम शुरू होते ही खाद्य पदार्थों की गुणवत्ता और स्वच्छता को लेकर महाराष्ट्र के खाद्य एवं औषधि प्रशासन (FDA) ने सख्त अभियान शुरू किया है। FDA आयुक्त तुकाराम…

गणरायाच्या साक्षीने बच्चू कडूंचा सरकारला थेट सवाल!

अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : यंदाच्या गणेशोत्सवात केवळ भक्तीच नव्हे, तर समाजातील ज्वलंत प्रश्नांनाही वाचा फोडण्याचा प्रयत्न आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. कुरळपूर्णा येथील त्यांच्या निवासस्थानी साकारण्यात आलेला…