नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : अभियंता दिनानिमित्त शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात हरित ऊर्जा, विद्युत सुरक्षा आणि वीज बचतीबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून लोकसहभागातून साजरा करण्याच्या उपक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना हरित ऊर्जा, विद्युत सुरक्षा आणि वीज संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री. प्रशांत काकडे, सहाय्यक अभियंता श्री. प्रशांत शिंदे, प्रधान ऑपरेटर श्री. श्रीकांत तसेच महावितरणच्या इतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी संसाधन व्यक्तींनी अक्षय ऊर्जेचे महत्त्व, विद्युत उपकरणांचा वापर करताना घ्यावयाची आवश्यक काळजी तसेच दैनंदिन जीवनात वीज बचत करण्याच्या सोप्या उपायांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सुरक्षित, जबाबदार आणि ऊर्जाबचत करणाऱ्या सवयी अंगीकाराव्यात, यासाठी कार्यक्रमातून प्रबोधन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. रेश्मी उमेश, उपमुख्याध्यापिका सौ. शैली अय्यर तसेच पर्यवेक्षक श्री. राहुल घोडे आणि श्री. शैलेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली जगताप यांनी केले.


