अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : अहिल्यानगर शहरात गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांकडून विविध देखाव्यांची तयारी सुरू झाली आहे. शहरात सामाजिक प्रबोधनपर देखावे वर्षानुवर्षे अत्यंत कल्पकतेने सादर करणारी अनेक मंडळे आहेत. या मंडळांच्या देखाव्यांकडे नागरिकांचे लक्ष लागलेले असते. नव-नवीन प्रासंगिक देखावे तसेच सध्याच्या घडामोडींवर आधारित देखावे सादर करून प्रेक्षकांची मने जिंकण्याचा मंडळांचा प्रयत्न असतो. अशा मंडळांच्या देखाव्यांची मालिका क्षणचित्रांसह ‘लोकतंत्र मिरर न्यूज’ माध्यमातून गणेशभक्तांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
शहराचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडी येथील विशाल गणेश मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे श्रीगणेशाची स्थापना झाली असून, मंदिर ट्रस्ट व मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रामुख्याने महिला भजनी मंडळाचे भजन, गणपती अथर्वशीर्ष पठण, नामवंत गायकांचे गायन अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मानाच्या या श्रीगणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते.
चला तर, पुढील उर्वरित दिवसांत मंडळांचे देखावे, त्यामागील सामाजिक परिवर्तनाचा आशय आणि मंडळाची परंपरा अशा विविध पैलूंची ओळख करून घेऊया. सुरुवात अहिल्यानगरचे ग्रामदैवत व मानाच्या श्री विशाल गणपतीच्या दर्शनाने करूया!


