पुणे ,आशिष औंढेकर ( प्रमुख पश्चिम महाराष्ट्र ) : सरहद विद्यालय कात्रज येथे यंदाच्या गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) कार्यापासून प्रेरणा घेत ‘Sarhad: From Dreams to Space’ ही अभिनव संकल्पना साकारली आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करून स्वयंचलित रॉकेट प्रक्षेपणाचा आकर्षक देखावा उभारला आहे.
या सजावटीमध्ये चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ‘चंद्रयान’ उपग्रहाचेही सुंदर प्रतिरूप तयार करण्यात आले आहे. विविध तांत्रिक घटकांचा कुशल वापर करत विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधनाची संकल्पना प्रभावीपणे मांडली आहे. शिक्षिका योगिता सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष पुरोहित, सम्राट शिंदे, मधुरा घोडके, सिद्धार्थ कानुनजे, सर्वज्ञ गायकवाड, प्रिया नापते, अश्वत्थ गायकवाड, विनायक गुमटे, तनिष्का रनवाळ, संचित काळहाणे, ओंकार शिंदे आणि अखिलेश कोळेकर या विद्यार्थ्यांनी या अभिनव सजावटीच्या निर्मितीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्ञानाला प्रोत्साहन देणारी ही सजावट गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.
विशेष म्हणजे, सरहद परिवारामध्ये गणेशोत्सव अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जातो. इको-फ्रेंडली गणेशमूर्ती, पर्यावरणाचा विचार करून करण्यात येणारी सजावट तसेच गणेशमूर्तीचे शाळेच्या परिसरातच विसर्जन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येतो. सरहद राजाची मिरवणूक देखील पारंपरिक उत्साहासोबत सामाजिक जाणीव जपणारी असते. वारकरी संप्रदायातील अनाथ विद्यार्थ्यांना सोबत घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात सरहद राजाची मिरवणूक काढली जाते. त्यामुळे भक्ती, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम या गणेशोत्सवातून अनुभवायला मिळतो. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव न राहता त्याला विज्ञान, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची जोड देण्याचा सरहद परिवाराचा हा प्रयत्न आहे.


