अमरावतीत दिवसाढवळ्या कॉलेज विद्यार्थिनीची निर्घृण हत्या ; शर्वरी हाडकेच्या मृत्यूने शहर हादरले

अमरावती,राज माहोरे (प्रतिनिधी)  :  शहरातील रविनगर नाल्यावरील पुलाजवळ गुरुवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने अमरावतीकरांना हादरवून सोडले आहे. शर्वरी गणेश हाडके या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर एका युवकाने भरदिवसा चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाविहार परिसरातील रहिवासी असलेली शर्वरी हाडके ही बियाणी सायन्स कॉलेजमध्ये बीएससी प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास रविनगर नाल्यावरील पुलाजवळ एका युवकाने तिचा रस्ता अडवून चाकूने हल्ला केला. आरोपीने तिच्यावर सपासप वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. प्राथमिक माहितीनुसार, शर्वरीच्या शरीरावर चाकूचे आठ खोल वार झाले होते. हल्ला सुरू असल्याचे पाहून परिसरातील ऑटोचालक विनय काळे आणि प्रवासी राहुल इंगोले यांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांनीही हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न करत शर्वरीची त्याच्या तावडीतून सुटका केली. मात्र, संधी साधून आरोपी रेड-चॉकलेट रंगाच्या होंडा शाईन दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला. रक्तबंबाळ अवस्थेतील शर्वरीला विनय काळे आणि राहुल इंगोले यांनी तातडीने ऑटो रिक्षामधून रिम्स रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रिम्सचे डॉ. वानखडे यांनी घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले.

शर्वरी ही अत्यंत सामान्य आणि कष्टकरी कुटुंबातील होती. तिचे वडील गणेश हाडके हे नावंदर पब्लिसिटीमध्ये होर्डिंग लावण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबात आई, वडील, शर्वरी आणि एक लहान भाऊ असे चार सदस्य आहेत. एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूने हाडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आईचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. दिवसाढवळ्या घडलेल्या या निर्घृण हत्याकांडामुळे शहरभर खळबळ उडाली आहे. घटनेनंतर रिम्स रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. परिसरातील नागरिकांनी आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

धाडसी नागरिकांचे सर्वत्र कौतुक

युवतीवर जीवघेणा हल्ला होत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीसाठी धाव घेणारे विनय काळे आणि राहुल इंगोले यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या तत्परतेमुळे जखमी शर्वरीला तातडीने उपचार मिळू शकले. संकटाच्या क्षणी दाखविलेल्या त्यांच्या सामाजिक बांधिलकीची शहरभर चर्चा सुरू आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…