अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासूनची डिंबे–माणिकडोह बोगद्याची मागणी आता पूर्णत्वाच्या दिशेने पुढे जात आहे. माजी मंत्री आदरणीय बबनदादा पाचपुते यांनी या बोगद्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी देखील या विषयाचा पाठपुरावा सुरू ठेवला. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुकडी प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याने या बोगद्याच्या पुढील प्रक्रियेलाही चालना मिळाली आहे.
बोगदा पूर्ण झाल्यानंतर कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पावसाळ्यातील नद्यांतून समुद्राकडे जाणारे अतिरिक्त पाणी अधिक वेगाने कुकडीच्या कार्यक्षेत्रात आणता येईल आणि पाण्याची कमतरता भासणाऱ्या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यास मदत होईल. श्रीगोंदा, पारनेरचा काही भाग, कर्जत आणि जामखेड या भागातील शेतकऱ्यांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.
या निर्णयासाठी पाठपुरावा करणारे माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, आदरणीय श्री. राधाकृष्णजी विखे पाटील साहेब तसेच मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानतो, असे आमदार पाचपुते म्हणाले. आता पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन बोगद्याच्या प्रत्यक्ष कामाला लवकर सुरुवात व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरूच राहील.


