नागपूर,सतीश तोडासे (प्रतिनिधी) : चोरीच्या विविध गुन्ह्यांचा तपास करत नागपूर शहर पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 69 लाख 57 हजार 583 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. हा मुद्देमाल त्याच्या खऱ्या हक्कदार नागरिकांना परत करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, नागपूर पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये 172 मोबाईल फोन, 15 नग सोन्या-चांदीचे दागिने आणि 11 दुचाकी वाहनांचा समावेश आहे. चोरीला गेलेला हा मुद्देमाल पुन्हा आपल्या मालकांच्या स्वाधीन करण्यात आला. या मुद्देमालाचे प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात वेगळे महत्त्व होते. कुणासाठी तो दैनंदिन वापरातील मोबाईल होता, कुणासाठी आयुष्यभराच्या मेहनतीने घेतलेले सोन्या-चांदीचे दागिने, तर कुणासाठी रोजीरोटीचे साधन असलेली दुचाकी होती. त्यामुळे चोरीचा मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद पाहायला मिळाला.
चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करणे आणि तो योग्य मालकांपर्यंत पोहोचवणे, ही पोलिसांच्या तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेची महत्त्वाची बाब मानली जात आहे. मुद्देमाल परत मिळाल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद आणि नागपूर पोलिसांवरील वाढलेला विश्वास हेच या कारवाईचे खरे यश ठरले आहे.


