पुणे, राज माहोरे ( प्रतिनिधि ) : शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्या आणि माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २७ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अष्टविनायक दर्शन व विकासकामांचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आठही अष्टविनायक देवस्थानांचे दर्शन घेतले. प्रत्येक देवस्थानाच्या धार्मिक व सामाजिक कार्यासाठी त्यांनी वैयक्तिकरित्या प्रत्येकी १२ हजार रुपये, अशी एकूण ९६ हजार रुपयांची देणगी दिली.
दौऱ्यात डॉ. गोऱ्हे यांनी देवस्थानांच्या विश्वस्त व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, महिला स्वच्छतागृहे, पार्किंग, प्रकाशव्यवस्था, सुरक्षा आणि सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. अष्टविनायक देवस्थानांना जोडणारे बहुतांश रस्ते मागील दौऱ्याच्या तुलनेत चांगले झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, महिला भाविक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी प्रमुख मार्गांवर सुरक्षित महिला स्वच्छतागृहे उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लेण्याद्रीसाठी स्वतंत्र पाठपुरावा
अष्टविनायक मंदिरांच्या जीर्णोद्धार आराखड्यात लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मज मंदिराचा समावेश झालेला नसल्याची बाब मंदिर समितीने डॉ. गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणून दिली. संरक्षित मंदिराला धक्का न लावता पायथ्याचा परिसर, स्वच्छता, पिण्याचे पाणी, विश्रांतीची जागा, महिला स्वच्छतागृहे आणि परिसर सुशोभीकरणासाठी स्वतंत्र निधी मिळविण्याचा पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पाली येथे तात्पुरत्या ताडपत्रीची व्यवस्था
पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविकांना पावसात भिजावे लागत असल्याची अडचण देवस्थान समितीने मांडली. तातडीची गैरसोय दूर करण्यासाठी मंदिर समितीशी समन्वय साधून तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्रीचे आच्छादन करण्याची व्यवस्था डॉ. गोऱ्हे वैयक्तिकरित्या करणार आहेत. कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. ओझर येथे मंदिराच्या अंतर्गत भागातील कामे पुरातत्त्व विभागाच्या सूचनांनुसार झाल्याचे दिसून आले. येडगाव जलाशयात नौकाविहारास शासनाने दिलेल्या परवानगीमुळे पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
“हा दौरा केवळ दर्शनाचा नव्हता. पूर्वी दिलेल्या सूचनांची किती अंमलबजावणी झाली, कोणती कामे पूर्ण झाली आणि कोणते प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत, याचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचा हा प्रयत्न होता. अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचा श्रद्धा, ऐतिहासिक वारसा, महिला सुविधा आणि पर्यटनविकास या दृष्टीने समन्वित विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू राहील,” असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.


