कळमेश्वर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : कळमेश्वर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री व कृषी उत्पन्न बाजार समितीची ६७ वी वार्षिक आमसभा सहकार महर्षी बाबासाहेब केदार सभागृहात पार पडली. या आमसभेला माजी मंत्री सुनील केदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कोढे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सुनील केदार यांच्या सूचनेनुसार सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील खरेदी-विक्री संस्था तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आमसभा एकत्र घेण्यात आल्याने संस्थेचा सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च वाचला असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्याची राज्य शासनानेही दखल घेत संस्थेचा गौरव केल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेमार्फत औषधे, बी-बियाणे आणि अन्य कृषी साहित्याची विक्री केली जाते. यासोबतच यावर्षी ‘सहकार भारत गॅस’ या नावाने गॅस एजन्सी सुरू करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. धापेवाडा येथे गॅस एजन्सीचे गोदाम व शोरूम उभारण्यात आले आहे. दरम्यान, आमसभेत बोलताना माजी मंत्री सुनील केदार यांनी खतांच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना आवश्यक कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आमसभेत संस्थेचा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-वाटप, कर्जमर्यादा, अंदाजपत्रक आणि लेखापरीक्षण अहवालासह विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. तसेच धापेवाडा येथील ‘सहकार भारत गॅस’ गोदाम व शोरूमसाठी झालेल्या खर्चासही मंजुरी देण्यात आली. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष मुक्ता कोकडे, माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अश्विन बैस, सावनेर बाजार समितीचे सभापती रवींद्र चिखले, पंचायत समितीचे माजी सभापती श्रावणदादा भिंगारे, माजी उपसभापती नरेंद्र पालटकर, खरेदी-विक्री संस्थेचे उपाध्यक्ष आशिष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश गोतमारे, माजी जि. प. सदस्य देवानंद कोहळे, अरविंद रामावत, बाजार समितीच्या उपसभापती प्रतिभा पालटकर यांच्यासह संचालक मंडळ, शेतकरी सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


