नागपूर : देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांप्रती आदर, कृतज्ञता आणि देशभक्तीची भावना व्यक्त करण्यासाठी नागपूरकरांच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यंदाही विविध सामाजिक, आध्यात्मिक, महाविद्यालयीन, सांस्कृतिक, क्रीडा व सैनिक संघटनांच्या सहभागातून राखी संकलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजक डॉ. निखिल भुते यांच्या पुढाकाराने आम्ही नागपूरकर, तायवाडे कॉलेज, तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी, तायवाडे कॉलेज ऑफ नर्सिंग तसेच विविध सामाजिक व महिला संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि नागपूरकरांनी जवानांसाठी प्रेम, आपुलकी व देशभक्तीच्या भावनेतून राख्या तयार केल्या. या राख्या कारगिल पोस्ट, लडाख येथे तैनात असलेल्या भारतीय जवानांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. यावेळी नागपूरकरांच्या वतीने प्रशासनामार्फत या राख्या सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली. याप्रसंगी राजे मुधोजी महाराज भोसले, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. निखिल भुते, माजी उपमहापौर व नगरसेवक किशोर कुमेरिया, प्राचार्य डॉ. गीता लोधी, प्रा. विक्रांत चिलाटे, प्रा. डॉ. वंदना ठणगावले, डॉ. वर्षा वैद्य, कमलेश माचेवार, अभिजीत दरवडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल गुप्ता, पंकज बांन्ते यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रवीणा दाढे, स्नेहा नंदनवार, पायल रोकडे, अनुष्का बांबोडे, भूमिका निनावे आणि इकरा अन्सारी यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना राखी बांधून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. बबनरावजी तायवाडे यांनी या देशभक्तीपर उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी व नागपूरकरांनी जवानांसाठी व्यक्त केलेले प्रेम आणि आपुलकी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांपर्यंत प्रेमाचा हा धागा पोहोचविण्याचे कार्य नागपूरकर व महाविद्यालयाच्या माध्यमातून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. निखिल भुते यांनी केले. प्रास्ताविक डॉ. वर्षा वैद्य यांनी, तर आभार प्रदर्शन कमलेश माचेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आम्ही नागपूरकरचे पदाधिकारी, तायवाडे कॉलेजचे विद्यार्थी आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


