चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ ऑगस्ट रोजी ‘विकसित भारत-युवा कनेक्ट’ या देशव्यापी उपक्रमांतर्गत तरुण, युवा खेळाडू आणि विद्यार्थ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. ‘खेलो इंडिया संवाद-खेल की बात पीएम मोदी के साथ’ या उपक्रमांतर्गत सरदार पटेल महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आभासी पद्धतीने थेट संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सरदार पटेल महाविद्यालयाची निवड केली होती. यावेळी पंतप्रधानांनी ‘जो खेलेगा, वो खिलेगा’ असा संदेश देत खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. खेळाडूंमुळे त्यांच्या राज्याची आणि शहराची देशात वेगळी ओळख निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. देशाला २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी सक्षम खेळाडू घडवायचे असून, त्यासाठी देशभरात ‘टॅलेंट हब’ अर्थात गुणवत्ता शोध केंद्रे विकसित करण्याची गरज असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केले महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर होते. उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल खेळाडू स्वप्निल जितेंद्र गोंड, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू सखी दोरखंडे, राष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू कबीर साळवे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक, खेळाडू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेहनत, चिकाटी आणि नियमित सराव हेच यशस्वी खेळाडूचे आधारस्तंभ आहेत. केवळ उपजत प्रतिभेपेक्षा दररोज घाम गाळून केलेली मेहनत खेळाडूला यशाच्या शिखरावर पोहोचवते, असे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे संचालन स्वयंसेवक रोशन चौधरी यांनी केले, तर गौरव झाडे यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. काटकर यांनी उपस्थितांना ‘विकसित भारत-नशामुक्त युवा’ ही शपथ दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. दरम्यान, सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार तसेच कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे आणि जीनेश पटेल यांनी या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.


