मोर्शी , राज माहोरे (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजा भांबोरा येथे गुरुवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चरणदास वासुदेव इखे हे आपल्या शेतात शेतीची कामे करीत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे भांबोरा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास इखे यांच्या पत्नीने मुलाला वडिलांना जेवणासाठी बोलावून आणण्यास पाठवले. मुलगा वडिलांचा शोध घेत असताना शेतात रक्त सांडलेले आढळले. त्याने ही माहिती आईला दिल्यानंतर ती गावात परतली आणि ग्रामस्थांसह पुन्हा शेतात गेली. शोध घेत असताना शेतालगतच्या जंगलाच्या दिशेने चरणदास इखे यांना फरपटत नेल्याच्या खुणा आढळून आल्या. पुढे जंगलात त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक पाहणीत वाघाने त्यांच्या नरडीवर हल्ला केल्याचे निदर्शनास आल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सौ. आरती राजेश वानखडे, तहसीलदार सागर ढवळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात वाघाच्या पावलांचे ठसेही आढळून आले आहेत. वन विभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आरती राजेश वानखडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. मृतदेहाचा पंचनामा सुरू असून पुढील तपास वन विभाग आणि मोर्शी पोलीस करीत आहेत.
वारसाला शासकीय नोकरी देण्याची मागणी
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांना नियमानुसार आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, मृताचे वारस आणि सौ. आरती राजेश वानखडे यांनी केवळ आर्थिक मदतीऐवजी मृताच्या वारसाला शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची ठाम मागणी केली. या मागणीसंदर्भात आरती राजेश वानखडे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वीय सहाय्यक तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मृताच्या वारसांच्या मागणीची माहिती दिली. त्यानंतर प्रशासनाकडून वन विभागामार्फत शासन स्तरावर मृताच्या वारसाला शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, तातडीची मदत म्हणून मृताच्या वारसाला वन विभागांतर्गत कंत्राटी तत्त्वावर तत्काळ नियुक्ती देण्यास प्रशासनाने सहमती दर्शविली आहे. पुढे त्याला कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी हमी आरती राजेश वानखडे यांनी कुटुंबीयांना दिली. तसेच त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी आरती राजेश वानखडे, तहसीलदार सागर ढवळे, प्रदीपभाऊ गौरखेडे, DFO सुमित कुमार, RFO प्रशांत भुजाडे, मोर्शी पोलीस ठाणेदार आठवले, तालुकाध्यक्ष विकास तट्टे, सचिन कोकाटे, नितेश जाने, गौरव मडघे, सागर माहोरे, अजय वरघट, योगेश बहुरूपी, संकेत कडू यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


