अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : अकोले तालुक्यातील परखतपूर येथील रहिवासी तथा दशोनाम गोसावी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करणारे श्री. सूर्यभान तुकाराम गोसावी यांना ‘दशोनाम गोसावी समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दशोनाम गोसावी समाज परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बीड येथे आयोजित महाअधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजातील एकता, शिक्षण, संस्कृती, समाजजागृती तसेच समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
गोसावी यांनी समाजातील युवकांना शिक्षण, रोजगार व व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यासोबतच गरजू व ज्येष्ठ नागरिकांना मदत, शैक्षणिक व वैद्यकीय सहकार्य, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच समाजातील एकता व बंधुभाव वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. समाजाच्या प्रगतीसाठी आयुष्य समर्पित करून कार्य करणाऱ्या सूर्यभान तुकाराम गोसावी यांच्या या सन्मानाबद्दल विजय गोसावी, बाबासाहेब गोसावी, विशाल गोसावी, दत्तात्रय गिरी, माजी सरपंच राजेंद्र वाकचौरे, अविनाश देशमुख आदींनी अभिनंदन केले.


