मोर्शी, राज माहोरे ( प्रतिनिधि ) : मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील भांबोरा शेतशिवारात वाघाने केलेल्या अचानक हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चरणदास वासुदेव इखे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चरणदास इखे हे शेतातील कामासाठी गेले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. वनविभागाला माहिती देण्यात आल्यानंतर अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या घटनेमुळे भांबोरा परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात वाघाचा वावर असल्याने शेतात जाताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वनविभागाकडून परिसराची पाहणी करून वाघाच्या हालचालींचा शोध घेतला जात आहे.


