मुंबई , गोविंद येतयेकर (माध्यम प्रमुख ) : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने सहार रोड येथील कार्गो परिसरातील संघाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. या नवीन कार्यालयामुळे कार्गो विभागातील कामगारांना संघटनेशी थेट संपर्क साधण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
कामगारांच्या अडचणी, सेवा-संबंधित प्रश्न, वेतन व भत्ते, कामाच्या अटी, रोजगाराची सुरक्षितता, कायदेशीर हक्क तसेच इतर औद्योगिक प्रश्न सोडविण्यासाठी संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने विविध कामगार संघटनांमधील शेकडो कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात प्रवेश केला. राष्ट्रीय कर्मचारी सेनेतील शेकडो वाहतूकदार व कर्मचाऱ्यांनीही संघटनेत प्रवेश केला. तसेच वाहतूकदारांची मोठी संघटना असलेली ऑल इन वन ओनर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशन अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाशी संलग्न झाली. याशिवाय, AIASL मधील भारतीय कामगार सेना (उबाठा) चे सुमारे ४५० सदस्य कामगार अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सदस्य झाले. या प्रवेशामुळे कार्गो विभागातील संघटनेची ताकद आणि प्रभाव अधिक मजबूत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी महासंघाचे सरचिटणीस सुहास माटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, हा प्रवेश केवळ सदस्यसंख्येतील वाढ म्हणून पाहता येणार नाही. कार्गो विभागातील कामगारांमध्ये संघटनेविषयी वाढत असलेला विश्वास आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या कार्यपद्धतीला मिळत असलेला व्यापक प्रतिसाद याचे हे प्रतीक आहे. कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील.


