नांदेड , रविन्द्र औंढेकर ( जिल्हा प्रतिनिधी ) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पूर्णाकृती ब्राँझ धातूचा पुतळा नांदेड शहरात उभारण्यात येणार आहे. सुमारे १५ फूट उंचीच्या या पुतळ्याच्या निर्मितीसाठी ४१ लाख ३० हजार रुपयांची निविदा स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आली आहे. ही माहिती स्थायी समितीचे सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी दिली.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा १८ ऑगस्ट रोजी सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्राप्त झालेल्या निविदांना मंजुरी देण्यात आली. या कामासाठी दुसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पाच निविदाधारक सहभागी झाले होते. त्यापैकी तीन निविदा पात्र ठरल्या. दिल्ली येथील राम सुतार आर्ट्स यांनी १५ फूट उंचीच्या पुतळ्यासाठी ७५ लाख रुपयांची निविदा भरली होती. अमरावती येथील गणिती कला केंद्राने ५७ लाख रुपयांची निविदा सादर केली. तर पुणे येथील मे. ऋषी आर्ट्स यांनी ४१ लाख ३० हजार रुपयांची सर्वात कमी दराची निविदा भरली. त्यामुळे या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली.
२५ डिसेंबरपूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीपूर्वी, म्हणजेच २५ डिसेंबरपूर्वी पुतळा उभारणीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सभापती गाडीवाले यांनी सांगितले. शहरात पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चितीचे काम सध्या सुरू आहे. जागा निश्चित झाल्यानंतर पुतळ्याच्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे. ही निविदा लवकरच काढून सुशोभीकरणाच्या कामालाही प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी दिली.


