मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत संभ्रमात असलेल्या गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. विशेषतः मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य गणेशमूर्ती हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. मात्र, पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनावर असलेल्या निर्बंधांमुळे यंदा मोठ्या मूर्तींचे विसर्जन कसे करायचे, हा प्रश्न मंडळांसमोर होता. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने २४ जुलै २०२५ रोजी दिलेला आदेश कायम ठेवला आहे. अंतिम निकाल होईपर्यंत हा आदेश लागू राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करता येणार आहे.
पीओपीच्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होत असल्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यापूर्वी न्यायालयाने पीओपीच्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास बंदी घातली होती. मात्र, त्यानंतर दाखल झालेल्या फेरविचार याचिकेवर २४ जुलै २०२५ रोजी न्यायालयाने सुधारित आदेश देत सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाला परवानगी दिली होती. आता हायकोर्टाने हाच आदेश कायम ठेवल्याने गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग काहीसा सुकर झाला आहे. मात्र, पीओपीमुळे होणारे संभाव्य जलप्रदूषण आणि पर्यावरणाचा प्रश्नही यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.


