नांदेड : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज सहज आणि जलद भरता यावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘महाडीबीटी २.०’ पोर्टलच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोर्टलमधील तांत्रिक अडचणी, ओटीपीची किचकट प्रक्रिया आणि कागदपत्रांच्या अटींमुळे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि महाविद्यालयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज भरण्यापासून ते पडताळणी आणि मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र आहे.
महाडीबीटी २.० वर शेतकऱ्यांच्या २०, दिव्यांग व निवृत्ती वेतनधारकांच्या ११ आणि विद्यार्थ्यांच्या ५४ शिष्यवृत्ती योजनांसह तब्बल १२१ योजना एकाच ठिकाणी आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोर्टलवर क्षमतेपेक्षा अधिक भार पडत असल्याची तक्रार आहे. अनेकदा पोर्टल हँग किंवा बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना सायबर कॅफे आणि महाविद्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
ओटीपीमुळे महाविद्यालयांची कोंडी
महाविद्यालयांच्या प्रोफाइलमध्ये प्राचार्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. त्यातच अर्ज तपासणीच्या प्रत्येक टप्प्यावर प्राचार्यांच्या मोबाइलवर ओटीपी येत असल्याने पडताळणीची प्रक्रिया वेळखाऊ ठरत आहे. परिणामी, अर्ज वेळेत तपासून मंजूर करणे महाविद्यालयांसाठीही कठीण झाले आहे.
जुना डेटा गायब; विद्यार्थ्यांची अडचण वाढली
महाडीबीटी १.० वरील विद्यार्थ्यांचा जुना डेटा नवीन पोर्टलवर उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना नो-ड्यूज प्रमाणपत्र मिळवताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणी टीसी आणि गुणपत्रकांसारखी महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे रोखून धरली जात असल्याचे आरोपही होत आहेत. आधीच शिष्यवृत्तीच्या पैशांची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या नव्या अडचणींमुळे आर्थिक आणि शैक्षणिक संकट अधिक गंभीर झाले आहे.
जात वैधतेची अट ठरतेय अडथळा
अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्राची अट येत असल्याची तक्रार आहे. संबंधित अभ्यासक्रमांसाठी या प्रमाणपत्राची आवश्यकता नसतानाही पोर्टलवर अट दिसत असल्याने प्रमाणपत्र नसलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
तांत्रिक अडचणींची मोठी यादी
महाडीबीटी २.० वरील पहिला आणि दुसरा हप्ता थकीत असतानाही त्याची माहिती पोर्टलवर दिसत नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेक महाविद्यालयांना अद्याप युजरनेम आणि पासवर्ड मिळालेले नाहीत. पोर्टलवरील माहिती अपूर्ण दिसणे, मोबाइल क्रमांक किंवा युजरनेम रिसेट करण्याची सुविधा नसणे आणि अर्ज तपासणीतील ‘सिलेक्ट ऑल’ तसेच ‘चेक लिस्ट’सारखे सोपे पर्याय उपलब्ध नसणे, अशा समस्यांमुळे महाविद्यालयीन प्रशासनाचीही मोठी कोंडी झाली आहे.
शिष्यवृत्ती हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा महत्त्वाचा आर्थिक आधार आहे. त्यामुळे पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींचा फटका थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आणि सक्षम पोर्टल सुरू करावे, तसेच रखडलेली पडताळणी व शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने मार्गी लावावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.


