मराठी नसेल तर चालकांचा परवाना होणार रद्द; आजपासून सुधारित नियम लागू

रिक्षा, टॅक्सी चालकांसह अॅप-कॅब चालकांनाही व्यावहारिक मराठी बंधनकारक; तीन महिन्यांपर्यंत परवाना निलंबित करण्याची तरतूद

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅप-आधारित कॅब चालकांसाठी आता मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६ अंतर्गत करण्यात आलेल्या नव्या बदलांची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांशी साधा संवाद साधता न आल्यास चालकांवर कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आलेल्या या सुधारणांमुळे व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी ‘कार्यकारी अर्थात व्यावहारिक मराठी’ची अट अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. यापूर्वीही ही अट अस्तित्वात होती; मात्र तिच्या अंमलबजावणीबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित झाले होते. मराठी न येण्यावरून चालक आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंगही घडले आहेत.

नियम मोडल्यास परवाना निलंबित होणार

नव्या तरतुदीनुसार अधिकृत चालकाकडे आवश्यक मराठीचे ज्ञान नसल्याचे आढळल्यास संबंधित परवाना प्राधिकरणाला कारवाई करता येणार आहे. चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील संबंधित विभाग जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत निलंबित करता येईल. विशेष म्हणजे, निलंबनानंतरही नियमांचे पालन न केल्यास संबंधित परवाना कायमचा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक तेवढे मराठीचे ज्ञान आत्मसात करणे चालकांसाठी आता केवळ अपेक्षा राहिलेली नसून नियमाचा भाग बनले आहे.

अॅप-कॅब चालकांसाठीही स्वतंत्र तरतूद

नियम २२ मध्ये बदल करून इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या अॅप-आधारित मोटार कॅबच्या अधिकृत चालकांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. या चालकांनाही मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार आहे.

परमिटधारकांनाही मराठीची अट

नियम ७८ मध्ये करण्यात आलेल्या बदलानुसार ही अट केवळ चालकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. संबंधित परमिटधारकाकडेही मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच नियम ८५ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार अॅप-आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबच्या परमिटचे नूतनीकरण करतानाही परमिटधारकाचे मराठीचे ज्ञान तपासले जाऊ शकते. हे ज्ञान संबंधित प्राधिकरणाच्या समाधानकारक पातळीचे असणे आवश्यक आहे.

प्रवाशांशी संवादासाठी स्थानिक भाषा महत्त्वाची

प्रवाशाला कुठे जायचे आहे, त्याला कोणती अडचण येत आहे किंवा प्रवासादरम्यान काही समस्या निर्माण झाली आहे का, हे समजून घेण्यासाठी चालक आणि प्रवासी यांच्यात संवाद होणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक भाषेचे किमान व्यावहारिक ज्ञान असावे, यावर सरकारने भर दिला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माहितीनुसार, पूर्वीच्या नियमांमधील संदिग्धता दूर करून मराठी भाषेच्या अटीची अंमलबजावणी अधिक स्पष्ट करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.

‘कायदा’ नव्हे, सुधारित मोटार वाहन नियम

या निर्णयाला ‘महाराष्ट्र मोटार वाहन कायदा-२०२६’ असे म्हणणे योग्य नसून, हे बदल ‘महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६’ या नावाने करण्यात आले आहेत. मोटार वाहन अधिनियम, १९८८ अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये या सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते आणि मराठीच्या ज्ञानाची तपासणी कोणत्या पद्धतीने केली जाते, याकडे रिक्षा, टॅक्सी आणि अॅप-कॅब चालकांचे लक्ष लागले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…