मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसस्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. राज्यातील १४७ बसस्थानके आणि एसटीच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्थानके केवळ आधुनिकच नव्हे, तर शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ‘आयकॉनिक’ असावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे एसटीच्या जागांचा PPP तत्त्वावर विकास करण्याबाबत विशेष आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देण्यासोबतच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपलब्ध मालमत्तेचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करण्यावर भर देण्यात आला.
बसस्थानकांमध्ये मिळणार अनेक सुविधा
पहिल्या टप्प्यात १४७ बसस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. या ठिकाणी आधुनिक बस पोर्ट, प्रवासी सुविधा, कार्यालये, हॉस्पिटल, चित्रपटगृहे आणि नागरिक सेवा केंद्रे यांसारख्या सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. याशिवाय बसस्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन तसेच एसटीच्या इलेक्ट्रिक बसेससाठी स्वतंत्र चार्जिंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधा वाढण्यासोबतच ऊर्जा खर्च आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे.
जुन्या बसस्थानकांना मिळणार नवा चेहरा
राज्यातील अनेक एसटी बसस्थानकांच्या इमारती ४० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. जुन्या आणि कालबाह्य पायाभूत सुविधांमुळे प्रवाशांना आवश्यक त्या आधुनिक सुविधा देताना अडचणी येत आहेत. त्यामुळे ‘महाराष्ट्र एसटी महामंडळ २.०’ अंतर्गत बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्यावर भर दिला जात आहे. नव्या रूपातील बसस्थानकांमुळे प्रवासाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. त्याचबरोबर एसटीच्या मालमत्तेचा योग्य वापर होऊन महामंडळाच्या उत्पन्नालाही हातभार लागण्याची अपेक्षा आहे.


