पुणे : पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पाणीकपात आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून पुणे महापालिकेने नियमित पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत माहिती दिली. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील जलसाठा आता समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणे १०० टक्के भरली असून टेमघर धरण ९८ टक्के भरले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची चिंता आता दूर झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणीकपातीमुळे पुणेकरांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक भागांमध्ये पाणी मिळण्याच्या वेळेत बदल करण्यात आले होते. मात्र धरणांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता शहरातील पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे नियमित होणार आहे.
मुसळधार पावसामुळे वाढला जलसाठा
जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा घटला होता. त्यामुळे महापालिकेने १५ जूनपासून शहरात पाणीकपात लागू केली होती. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. आषाढी वारीच्या काळात पाच दिवसांसाठी पाणीकपात मागे घेण्यात आली होती. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार होता.
नागरिकांच्या मागणीला यश
पाणीकपात रद्द करण्यासाठी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. अखेर धरणांमधील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाण्याची चिंता दूर झाल्याने पुणेकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाने साथ दिल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सध्या तरी मिटला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


