आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेत यंदाही एसटीची ‘लालपरी’ विश्वासाची साथीदार ठरली. यावर्षी आषाढी यात्रेदरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) तब्बल ९ लाख २४ हजार ७३८ भाविकांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवले.
यात्रेसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून सुमारे ५,५०० विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या. या काळात २१ हजार ५२७ फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या. या विशेष वाहतुकीतून एसटी महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, वारकऱ्यांना सुखरूप पंढरपूरपर्यंत पोहोचवणे आणि दर्शनानंतर सुरक्षितपणे घरी आणणे ही केवळ प्रवासी सेवा नसून विठ्ठलाची सेवा आहे. लाखो भाविकांची सेवा करण्याचे भाग्य एसटी परिवाराला लाभले, ही विठुरायाची कृपाच असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आषाढी यात्रेदरम्यान चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत भाविकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली. प्रचंड गर्दी आणि आव्हानात्मक परिस्थितीतही प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. सरनाईक यांनी पुढे सांगितले की, एसटी ही केवळ प्रवासी वाहतूक करणारी संस्था नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी जोडलेली लोकवाहिनी आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा आनंद आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच एसटीच्या सेवेची खरी कमाई असल्याचे त्यांनी नमूद केले.


