पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २६.६६ टीएमसी म्हणजेच ९१.४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षासाठी पुण्याच्या पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीसाठी लागणाऱ्या सिंचनाच्या पाण्याची मोठी चिंता दूर झाली आहे.
यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने पुणे शहरात १५ जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. मात्र जुलैमध्ये पावसाने दमदार हजेरी लावताच धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. परिणामी आता धरणसाखळी जवळपास पूर्ण क्षमतेने भरली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या पानशेत धरणात १०.२७ टीएमसी, वरसगावमध्ये ११.५२ टीएमसी, खडकवासला धरणात १.९७ टीएमसी आणि टेमघर धरणात २.८९ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीत ९१.३५ टक्के पाणीसाठा होता. यंदा त्यापेक्षाही किंचित अधिक साठा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. सकाळी २,५६८ क्युसेकने सुरू असलेला विसर्ग आधी ८५६ क्युसेकपर्यंत घटवण्यात आला आणि त्यानंतर दुपारी २ वाजल्यानंतर तो पूर्णपणे बंद करण्यात आला.


