2008 साली रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने आज (21 मे) निकाल दिला आहे. तब्बल 18 वर्षांनी सदर प्रकरणाचा न्यायालयाने निकाल जाहीर केला. या सुनावणीवेळी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते.
सरकारी पक्षाने गुन्हा सिध्द होईल आणि आरोपींचा सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे मांडले नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. त्यामुळे पुराव्यानभावी राज ठाकरे यांना ठाणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर राज ठाकरेंनी केले?
राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी न्यायालयाने राज ठाकरेंसह 8 लोकांना आज निर्दोष सोडले आहे. सगळीकडे तरूणांनी आंदोलने केली त्यांचा संबंध राज ठाकरेंशी जोडला होता. राज ठाकरेंना या प्रकरणात तत्कालीन सरकारने अडकवण्याचा प्रयत्न केला, असं अविनाश जाधव म्हणाले. राज ठाकरेंनी निकालानंतर स्मितहास्य केलं. तसेच न्यायालयातून खाली येताना अस्वालाच्या अंगावरचा एक केस कमी असं राज ठाकरे म्हणाले, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.
न्यायालयात आज राज ठाकरे आणि इतर पक्ष यांचा जबाब घेण्यात आला होता. या गुन्हाशी माझा काहीही संबंध नाही असं राज ठाकरेंनी न्यायालयात सांगितलं होतं, आंदोलनावेळी मी नाशिकला होतो, असंही राज ठाकरेंनी न्यायालयात सांगितलं होतं.
2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांवर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. ज्यात “मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या” असा आरोप करत, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोप त्यात करण्यात आले होते.
सदर प्रकरणी राज ठाकरेंसह सात इतर मनसैनिकांवर विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती, पण नंतर राज ठाकरेंना दिलासा मिळाला होता. या प्रकरणी कल्याण न्यायालयात सुनावणी सुरू होती मात्र यानंतर हा गुन्हा ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला. सुनावणी दरम्यान आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने राज ठाकरे सह सर्व आरोपींना न्यायालयाने समज बजावत अटक वॉरंट देखील बजावले होते. यानंतर राज ठाकरे यांच्या वकिलाने न्यायालयात अर्ज देऊन ते अटक वॉरंट देखील रद्द केला होता.


