नांदेड ,रविन्द्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी ) : भारतातील लायनिझमच्या ७० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा उत्सव साजरा करण्यासाठी लायन्स इंटरनॅशनलच्या वतीने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत लायनिझमच्या प्रचार-प्रसारासाठी तसेच समाजात जनजागृती करण्यासाठी माजी राज्यमंत्री लायन डी. पी. सावंत यांची लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ एच-२चे जिल्हा प्रांतपाल लायन दत्तात्रय औसेकर यांनी ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली.
लायन डी. पी. सावंत हे ७० वर्षांच्या गौरवशाली लायनिझमच्या इतिहासात गेली ३५ वर्षे लायन्स क्लब नांदेड मिडटाऊनचे सदस्य म्हणून सक्रिय कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रातील योगदानाचा तसेच व्यापक जनसंपर्काचा उपयोग करून लायन्सच्या ‘We Serve’ या सेवाभावी संदेशाचा समाजाच्या विविध स्तरांपर्यंत प्रसार करण्याचा उद्देश आहे. जिल्हा प्रांतपाल लायन दत्तात्रय औसेकर यांनी सांगितले की, ७० वर्षांचा लायनिझम हा केवळ एक उत्सव नसून, गरजूंच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या हजारो लायन्सच्या निःस्वार्थ सेवेला अभिवादन करण्याची ऐतिहासिक संधी आहे. या गौरवशाली परंपरेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी लायन डी. पी. सावंत यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या नियुक्तीबद्दल नांदेड लायन्स परिवाराच्या वतीने लायन डी. पी. सावंत यांचा सत्कार करून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपप्रांतपाल लायन योगेश जायसवाल, माजी प्रांतपाल ॲड. प्रविण अग्रवाल, जीएसटी समन्वयक रवी कडगे, लायन्स क्लब नांदेड मिडटाऊनचे अध्यक्ष सरताजसिंग कंधारवाले, लायन मनीष माकन, क्षेत्रीय अध्यक्ष, कोषाध्यक्ष केदार मालपाणी, लायन सतीश सामते, लायन विजय होकर्णे, लायन बसवराज निरणे आदी उपस्थित होते. ‘७० वर्षे सेवा, ७० वर्षे समर्पण आणि ७० वर्षे मानवतेची साथ’ या भावनेतून विविध सेवा प्रकल्प, जनजागृती कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


