नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील फुले मार्केटमधील ‘वेनलेस स्पा’मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापारावर ठाणे गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी केलेल्या कारवाईत नेपाळ, नागालँड, दिल्ली तसेच ठाणे व पुणे आदी ठिकाणाहून आणलेल्या सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून सदरील स्पा मालक संतोष बघे हा फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल, रोख रक्कम तसेच देह व्यापारासाठी वापरलेले साहित्य असा १ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांना ‘वेनलेस स्पा’मध्ये मसाजच्या नावाखाली अवैध देह व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कारवाई करण्यापूर्वी एक बोगस ग्राहक तयार करून त्याच्याकडे प्रत्येकी ५०० रुपयांच्या ८ अशा चार हजारांच्या नोटा क्रमांक नोंदवून देण्यात आल्या. त्यानंतर बोगस ग्राहकाला त्या स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. तेथे देह व्यापारासाठी पैशाची मागणी करण्यात येताच त्याने पोलिसांना ठराविक इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.
तपासादरम्यान मॅनेजरला २००० आणि संबंधित महिलेला दोन हजार रुपये देण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधित रक्कम जप्त करून पोलिसांनी स्पा सेंटर चालवणे, व्यवस्थापन पाहणे तसेच महिलांना आमिष दाखवून देह व्यापारासाठी प्रवृत्त केल्याबद्दल हिफजूर, राजुद्दीन रफिक उद्दीन, रहमत आरिफुद्दीन (सर्व राहणार आसाम) आणि याहीया अहमद अब्दुल वाहिद यांना अटक केली. स्पाचा मालक संतोष बघे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. हा सर्व प्रकार हा केबल असलेल्या शिवाजीनगरच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना कसा लक्षात आला नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.


