नागपूर, सतीश तोडासे (प्रतिनिधि) : नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी नरेश अंकालू महिलांगे (वय ३४, रा. पुजाराम वाडी, डीप्टी सिग्नल, कळमना, नागपूर) याला न्यायालयाने सहा वर्षांचा कारावास आणि २० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. सेशन केस क्रमांक ६४७७/२०२१ मध्ये नागपूर येथील DJ-2 न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. या प्रकरणात लकडगंज पोलिसांनी केलेला शास्त्रीय तपास आणि प्रभावी पुरावे महत्त्वाचे ठरले.
लकडगंज पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १५/२०२१ अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या कलम ३८०, ४५७, ४११, ४१३, ४१४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध नागपूर शहर, नागपूर ग्रामीण तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत घरफोडी आणि शरीराविरुद्धचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA), तडीपार आणि MPDA अंतर्गतही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. आरोपी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे.
बंद घरांना लक्ष्य करून घरफोडी
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीची घरफोडी करण्याची विशिष्ट कार्यपद्धती होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाऊन रात्रीच्या वेळी बंद घरांना लक्ष्य करीत असे. घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्यानंतर पोलिसांची नजर चुकविण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करीत असे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ यांसह विविध जिल्ह्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले.
CCTV आणि वैज्ञानिक पुराव्यांची महत्त्वाची भूमिका
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी CCTV फुटेजचे सूक्ष्म विश्लेषण केले. त्यासोबत तांत्रिक पुरावे, रासायनिक विश्लेषकांचा (C.A.) अहवाल आणि इतर वैज्ञानिक पुरावे संकलित करण्यात आले. संबंधित साक्षीदारांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. संकलित पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता ॲड. साई खेडकर यांनी बाजू मांडली. तपासातील पुरावे आणि सरकारी पक्षाची प्रभावी मांडणी यामुळे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून सहा वर्षांचा कारावास आणि २० हजार रुपयांचा दंड सुनावला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई नागपूर शहर पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग), पोलीस उपायुक्त (परिमंडळ क्रमांक ३) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, लकडगंज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस हवालदार अमर काळे, नितीन सातपुते, पंकज दहापुते, शैलेंद्र चौधरी, आनंद मर्सकोल्हे, पोलीस अंमलदार सुशीला धुर्वे, कार्तिक मडगुलवार आणि मयूर बनसोडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळवा
नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करणे हे नागपूर शहर पोलिसांचे प्राधान्य आहे. घरफोडी, चोरी किंवा संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, लकडगंज पोलीस ठाणे, नागपूर शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


