अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : अकोले तालुक्यातील कोतूळ येथे दीपावली सणाचा मंगलमय प्रारंभ मानल्या जाणाऱ्या गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस या पवित्र पर्वानिमित्त श्री वरदविनायक देवस्थान येथे गोपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे. गोमातेच्या पूजनातून कृतज्ञता, श्रद्धा, निसर्गप्रेम तसेच भारतीय संस्कृतीतील कृषीपरंपरेचे महत्त्व अधोरेखित होते. वसुबारसेच्या निमित्ताने गोमातेचे विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी गोमातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. गोमाता ही भारतीय संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गोसेवा, गोसंवर्धन आणि गोमातेचे रक्षण ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या सोहळ्याच्या माध्यमातून देण्यात आला.
दीपावलीच्या पहिल्या मंगलमय पर्वाची सुरुवात गोमातेच्या पूजनाने झाल्याने देवस्थान परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी देवस्थानच्या वतीने अध्यक्ष प्रदीप भाटे यांच्या हस्ते गोपालक शाहीर कैलास अटक यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कोतूळ सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय दुटे, रमेश देशमुख, अनिल देशमुख, विनय समुद्र, कुलदीप नेवासकर, अजित आरोटे, सुभाष घाटकर, सागर सोनुले, अविनाश गीते, वृषाली समुद्र, प्रज्ञा भाटे, प्रियंका पाटील, विद्या परशुरामी, वर्षा नेवासकर, सविता घाटकर, कमल पोखरकर, मेधा देशमुख, पूनम महाजन यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


