पुणे, राजन शेळके ( प्रतिनिधी ) : पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात स्वारगेट रस्त्यावर चेंबर फुटल्याने दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, वाहनचालकांसह स्थानिक व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यावरून पीएमटी बससह मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच, वेळेवर इच्छित स्थळी पोहोचण्यातही अडचणी निर्माण होत आहेत. या परिसरापासून स्वारगेट बसस्थानक जवळच असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही या समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे.
परिसरात पसरत असलेल्या दुर्गंधीमुळे स्थानिक व्यापारीही त्रस्त झाले आहेत. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असताना पुणे महानगरपालिका याकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच, स्थानिक नगरसेवकांचेही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सांडपाण्याच्या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, पुणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चेंबरची दुरुस्ती करावी आणि परिसरातील दुर्गंधी दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


