नांदेड, (जिल्हा प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र उत्सवातील अष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून श्री दत्तात्रय शिखर संस्थान, माहूरगडच्या वतीने श्री क्षेत्र रेणुका मातेला मानाची ओटी अर्पण करण्यात आली. अनेक दशकांपासून चालत आलेली ही धार्मिक परंपरा यंदाही मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने जपण्यात आली.
माहूरगड पीठाधीश्वर परमपूज्य महंत डॉ. श्री श्री श्री १००८ धनेश्वर भारतीजी गुरू मधुसूदन भारतीजी महाराज यांच्या आदेशानुसार, संस्थानचे महापुरुष, विश्वस्त आणि कर्मचारी मानाची ओटीची साडी घेऊन श्री रेणुका माता मंदिराकडे पारंपरिक पद्धतीने गेले. त्यानंतर विधिवत पूजा करून आई रेणुका मातेच्या चरणी मानाची साडी अर्पण करण्यात आली.
या मंगलमय सोहळ्यामुळे माहूरगड परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सर्व भाविक भक्तांना सुख, समृद्धी, आरोग्य व कल्याण लाभावे, अशी प्रार्थना संस्थानच्या वतीने करण्यात आली. या परंपरेतून माहूरगडच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडते.


