रामटेक, प्रशांत भोयर ( प्रतिनिधी ) : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांचे आधार आधारित e-KYC पूर्ण करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रामटेक तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपल्या शिधापत्रिकेवरील प्रत्येक लाभार्थ्याचे e-KYC पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन शिवसेनेचे रामटेक उप तालुका प्रमुख तथा दक्षता समितीचे अध्यक्ष राजकुमार ज्ञानेश्वरजी खोब्रागडे यांनी केले आहे.
शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांची ओळख अधिक अचूक व सुरक्षितपणे निश्चित करण्यासाठी e-KYC प्रक्रिया महत्त्वाची आहे. e-KYC पूर्ण झाल्यानंतर आधारशी संबंधित उपलब्ध माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची ओळख पडताळणी करण्यात येते. तसेच लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यास आणि शिधावितरण व्यवस्थेत पारदर्शकता राखण्यास मदत होते. रामटेक तालुक्यातील नागरिकांनी आपल्या शिधापत्रिकेवरील कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांचे e-KYC पूर्ण झाले आहे का, याची खात्री करावी. e-KYC बाकी असल्यास जवळच्या रास्त भाव दुकानात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला तसेच ग्रामीण भागातील e-KYC प्रक्रियेची माहिती नसलेल्या नागरिकांना याबाबत आवश्यक सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. “आपले e-KYC पूर्ण करा आणि शिधापत्रिकेचा लाभ सुरक्षितपणे घ्या. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याचा शासकीय हक्काचा लाभ मिळावा, यासाठी आपण सर्वांनी e-KYC पूर्ण करण्यासाठी सहकार्य करूया,” असे राजकुमार ज्ञानेश्वरजी खोब्रागडे यांनी म्हटले आहे.


