अहिल्यानगर , राधेश्याम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. या पक्षात दिवंगत पूर्वज किंवा पितर या काळात स्वर्गलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे. श्रद्धेने दिवंगत व्यक्तींचे आणि पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी श्राद्धविधी करणे आवश्यक आहे. म्हणून विश्व हिंदू परिषद, मंदिर अर्चक पुरोहित आयामाच्या वतीने हिंदू समाजबांधवांसाठी सामुदायिक श्राद्धविधीचे आयोजन करण्यात आले होते. लालटाकी येथील खाकीदास बाबा मठ येथे या सामुदायिक श्राद्ध (तर्पण) विधीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे पौरोहित्य अॅड. सचिन पाठक गुरुजी यांनी केले.
या कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदू धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या या श्राद्धविधीमुळे पुण्यकर्माचा संचय होतो, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे विभागमंत्री सुनील खिस्ती यांनी केले. हरिभाऊ डोळसे म्हणाले, “आज अनेक कुटुंबांना स्वतंत्रपणे श्राद्ध करणे शक्य होत नाही, काहींना विधी माहीत नाही, तर काही शहरात एकटे राहतात. म्हणूनच आम्ही गेल्या वर्षी संकल्प केला होता की, समाजातील सर्वांसाठी एकत्रितपणे शास्त्रोक्त पद्धतीने तर्पण घडावे. पितरांच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही प्रगती शक्य नाही. ही फक्त पूजा नाही, तर आपल्या मुळाशी जोडले जाण्याची संधी आहे. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात करू.”
राधेश्याम कुलकर्णी म्हणाले, “भारतीय संस्कृती ही कृतज्ञतेची संस्कृती आहे. आपण देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण या तीन ऋणांतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो. आजच्या धकाधकीच्या काळात आपण आपल्या पूर्वजांना विसरत चाललो आहोत. पितृपक्ष हा आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतो. विश्व हिंदू परिषदेने हा जो सामुदायिक उपक्रम सुरू केला आहे, तो अतिशय स्तुत्य आहे. यामुळे हिंदू समाज एकत्र येतो आणि आपल्या संस्कारांचे जतन होते. संघाचेही हेच ध्येय आहे – समाज संघटित व्हावा आणि धर्म जागृत राहावा.” श्रीकांत नांदापूरकर म्हणाले, हरिभाऊ डोळसे यांच्या संकल्पनेतून सामुदायिक श्राद्ध या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पितरांचे पूजन हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा विधी समजला जातो. सर्वपित्री अमावस्येला सामुदायिक श्राद्ध करण्यात येते. सर्वांना पुण्यकर्म करता यावे, यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक पुरोहित आयामाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी विहिंप जिल्हामंत्री अनिल जोशी, विभागमंत्री सुनील खिस्ती, ज्येष्ठ मार्गदर्शक मिलिंद मोभारकर, विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पुरोहित आयामाचे विभागप्रमुख गजेंद्र सोनवणे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत नांदापूरकर, हरिभाऊ डोळसे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमोल भांबरकर, जिल्हा सहमंत्री शरद नगरकर, भारतीय जनता पार्टीचे मुकुल गंधे, अशोक गायकवाड, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष अॅड. अनंत फडणीस, मनोहर भाकरे, इंजिनीयर चंद्रकांत पुंड, कॅप्टन सुधीर पुंड, रा. स्व. संघाचे राधेश्याम कुलकर्णी, अरुण खिची, मोहनराव पाठक, अनंत होशिंग, उदय जोशी, अॅड. देवेंद्र बंब, रमेश देशमुख, धनंजय महाजन, दीपक कुलकर्णी, महेश देशपांडे, अनिता गिते, अंजली गिते, अभय गोले, धर्माधिकारी रमेश, राजहंस देसाई, अमित डावरे, रवि वैराळ, संजय, ओंकारेश्वर झावरे, विशाल बुंदेले, दत्तात्रय धोडपकर, सुधाकर घोरपडे, पोपटराव शिंदे, बापू बराटे, सतीश श्रीसागर, राजेंद्र चुंबळकर, अजय ठोकळ, निलेश चिपाडे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी खाकीदास बाबा मठ (ट्रस्ट)चे अध्यक्ष चंद्रकांत काबरा, विश्वस्त मनोज मुंदडा व सर्व विश्वस्त यांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी गजेंद्र सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.


