अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) :
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील पंचक्रोशीत परिचित असणारे, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ साधक, उत्कृष्ट गायक-वादक आणि कुशल कारागीर ह.भ.प. शिवनाथ रामचंद्र वाकचौरे मिस्त्री यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संगीत परंपरेतील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
ह.भ.प. शिवनाथ वाकचौरे यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाची परंपरा जपत भक्तिमार्गाची सेवा केली. काकडा, हरिपाठ, नित्यनेमाचे भजन तसेच संगीत भजन यांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आपल्या सुरेल आवाजाने आणि संगीताच्या जाणिवेने त्यांनी परिसरात गायक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती. पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या हरिनाम सप्ताहांना ते आवर्जून उपस्थित राहत असत. या सप्ताहांमध्ये गायन-वादनाच्या माध्यमातून ते आपली भक्तिसेवा अर्पण करत. त्यांच्या गायनातून भक्तिरसाची अनुभूती मिळत असे. वारकरी संगीत परंपरेचा अभ्यास आणि भजनाप्रती असलेली निष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांत त्यांनी सातत्याने योगदान दिले.
भक्तिसेवेबरोबरच शिवनाथ वाकचौरे हे एक उत्तम कारागीर म्हणूनही परिचित होते. मिस्त्रीकामातील कौशल्य, मेहनती वृत्ती आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांचा परिसरात लौकिक होता. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांत त्यांनी आपल्या कार्यातून वेगळी छाप उमटवली. त्यांच्या पश्चात पत्नी, कालिदास, भानुदास, अनिल व कोतूळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश वाकचौरे ही चार मुले तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे.


