अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) : रेशीम उद्योग हा केवळ जोडधंदा न राहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भविष्यात आर्थिक सुबत्ता देणारा सक्षम व्यवसाय ठरू शकतो. रेशीम कोष उत्पादनाबरोबरच कोषोत्तर प्रक्रियेत सहभागी होऊन ‘कोषापासून कापडापर्यंत’ मूल्यवर्धनाची साखळी निर्माण करण्याची गरज असून, त्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था (FPO) स्थापन करून सामूहिक पद्धतीने पुढे जाण्याचे आवाहन केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. करण सतीश यांनी केले.
ब्राह्मण बिझनेस नेटवर्क (BBN) वेलफेअर असोसिएशन आणि नगर येथील जिल्हा रेशीम कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेशीम उद्योग : एक उत्तम जोडधंदा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रेशीम मंडळाचे कर्नाटक राज्यातील शास्त्रज्ञ डॉ. करण सतीश यांनी रेशीम उद्योगाच्या भविष्यातील आर्थिक क्षमतेवर प्रकाश टाकताना सांगितले की, कर्नाटक राज्य रेशीम उत्पादनात देशात आघाडीवर असून, तेथील रेशीम उद्योगातून मिळालेले अनुभव महाराष्ट्रासाठीही मार्गदर्शक ठरू शकतात. महाराष्ट्राने रेशीम उद्योगाकडे अधिक डोळसपणे पाहून पुढील चार-पाच वर्षांत उत्पादनक्षमता, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांचा योग्य मेळ साधल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा रेशीम अधिकारी संदीप आगवणे यांनी रेशीम कोष उत्पादनानंतर उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक संधींची माहिती दिली. रेशीम कोषापासून रॉ सिल्क, रीलिंग, ट्विस्टिंग, वीव्हिंग, डाईंग, डिझायनिंग आणि तयार वस्त्रे तसेच विविध रेशीमजन्य उत्पादनांपर्यंत मोठी मूल्यसाखळी निर्माण करता येते. त्यामुळे केवळ कोष विक्रीवर अवलंबून न राहता कोषोत्तर प्रक्रियेत शेतकरी व नवउद्योजकांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. FPOच्या माध्यमातून निविष्ठांची सामूहिक खरेदी, आधुनिक तंत्रज्ञानाचा सामूहिक अवलंब, उत्पादनाचे सामूहिक विपणन, बाजारपेठेशी थेट जोडणी आणि कोषोत्तर प्रक्रिया उद्योग उभारणी यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. स्थानिक पातळीवर रीलिंग, वीव्हिंग, डाईंग व इतर मूल्यवर्धित प्रक्रिया सुविधा उभारल्यास ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीबरोबरच नवउद्योजकतेला चालना मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.
चर्चासत्रात अहिल्यानगर जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक संस्था (FPO) स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. सामूहिक उद्योजकतेच्या माध्यमातून रेशीम उद्योग अधिक संघटित, सक्षम आणि नफाक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात रेशीम उद्योग जोडधंदा म्हणून स्वीकारलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव, उत्पादनातील अडचणी, बाजारपेठेची परिस्थिती, शासकीय अनुदान, व्यवस्थापन आणि भविष्यातील संधी याबाबत माहिती दिली. काही रेशीम उत्पादक शेतकरी वर्षाला २२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत असल्याची माहिती जिल्हा रेशीम अधिकारी संदीप आगवणे यांनी दिली. यशस्वी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करून त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.
दरम्यान, रेशीम उत्पादनातील महत्त्वाच्या तांत्रिक समस्यांवरही चर्चा झाली. कीटकनाशकांच्या विषारी परिणामामुळे रेशीम कोषांचे नॉन-स्पिनिंग अर्थात कोष न फिरविण्याची समस्या निर्माण होऊ शकते. याबाबत डॉ. करण सतीश यांनी शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करत प्रतिबंधात्मक व सुधारात्मक उपाययोजनांची माहिती दिली. रेशीम कीटक संगोपनात शास्त्रीय पद्धतींचा अवलंब, कीटकनाशकांचा योग्य वापर आणि व्यवस्थापनातील काळजी यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या ‘मेरा रेशम मेरा अभिमान (MRMA) 2.0’ या उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ, राज्य रेशीम विभागाचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी-व्यावसायिक तसेच प्रगतीशील रेशीम उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनुलोम प्रतिष्ठानचे प्रमुख दीपक रोहोकले, ॲड. विवेक लगड पाटील (रेशीम निविष्ठा वितरक), प्रा. हर्षल आगळे, श्री. भगवान काटे (बचत गट संघटक) यांचीही प्रमुख उपस्थिती होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील रेशीम उद्योगाच्या विकासासाठी स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. केंद्रीय रेशीम मंडळाचे तांत्रिक मार्गदर्शन, राज्य रेशीम विभागाचे सहकार्य व ब्राह्मण बिझनेस वेलफेअर नेटवर्क या स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यात संघटित व सक्षम रेशीम उद्योगाच्या उत्कर्षाच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे पडले.
कार्यक्रमाच्या आयोजनात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क वेलफेअर असोसिएशनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संस्थेचे विश्वस्त निखिल कुलकर्णी यांनी संस्थेचे विविध उपक्रम व कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल धर्माधिकारी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शैलेश राजगुरू, श्रीपाद पुणतांबेकर आणि उमेश भालेराव यांनी करून दिला, तर हेमंत लोहगावकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिल्पा सोमणी, आसावरी नातू, वर्षा जोशी व मिलिंद कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.


