रासायनिक खते व हायब्रीड बियाणे हेच आजारपणाचे मुख्य कारण : पद्मश्री राहीबाई पोपेरे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नवदुर्गा सन्मान सोहळा संपन्न; नऊ कर्तृत्ववान महिलांचा गौरव

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नाशिक शहरातर्फे यंदाही आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नवदुर्गा सन्मान सोहळा नवरात्रीच्या पावन पर्वात ललिता पंचमीला शंकराचार्य संकुलातील कुर्तकोटी सभागृहात संपन्न झाला. यावेळी नाशिक विभाग संघचालक कैलासनाना साळुंखे आणि नाशिक शहर संघचालक डॉ. विजय मालपाठक व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नऊ कर्तृत्ववान महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी रासायनिक खते आणि हायब्रीड बियाण्यांच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी देशी बियाण्यांचे महत्त्व आणि त्यांचे फायदे सांगतानाच स्वतःच्या जीवनप्रवासातील अनुभवही मांडले.

देशी बियाण्यांचे संवर्धन ही काळाची गरज

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा जीवनप्रवास कष्ट, जिद्द आणि निसर्गाशी असलेल्या घट्ट नात्याचे प्रतीक आहे. ‘मला फक्त मातीचे काम येते, मी निसर्गाच्याच शाळेत शिकले,’ असे विनम्रपणे सांगणाऱ्या राहीबाईंच्या प्रवासाची सुरुवात शेतीकाम आणि गाई-म्हशींच्या संगोपनातून झाली. वडिलांकडून मिळालेले संस्कार आणि ‘टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही’ या विचारांवर श्रद्धा ठेवून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला.

अवघ्या १० रुपयांपासून बचत गट सुरू करून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. गावात लहान-लहान रोपे तयार करून ती बाहेरगावी विकण्याच्या माध्यमातून त्यांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल टाकले. मात्र, कालांतराने शेतीमध्ये हायब्रीड बियाणे आणि रासायनिक खतांचा वापर वाढू लागला. या बदलांमुळे अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपल्या घरात विषारी अन्न येऊ द्यायचे नाही, असा निर्धार त्यांनी केला.

देशी बियाण्यांचे महत्त्व ओळखून त्यांनी राखेमध्ये बियाणे साठवण्याची पारंपरिक पद्धत अवलंबली. या पद्धतीने बियाणे दीर्घकाळ टिकवता येते, असे त्यांनी सांगितले. रासायनिक पदार्थांचा वापर टाळून देशी बियाण्यांपासून तयार होणाऱ्या अन्नाला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘आज आपण पैसे देऊन विष विकत घेत आहोत,’ अशी खंत व्यक्त करत प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त आणि शुद्ध भाज्या असाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्या मातीचे रक्षण करणे, गावरान गायींचे संगोपन करणे, रानभाज्या आणि निसर्गाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी देशी बियाण्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश दिला.

भारतीय संस्कृती, नारीशक्ती आणि मूल्यांचे अधिष्ठान

कार्यक्रमात संत सेवा संघाचे पू. संजय गोडबोले गुरुजी यांनी ‘भारतीय संस्कृती, नारीशक्ती आणि मूल्यांचे अधिष्ठान’ या विषयावर मार्गदर्शन केले. भगवद्गीतेतील दहाव्या अध्यायातील ३४ व्या श्लोकाचे त्यांनी विवेचन केले. ‘अनुभवाचे सामर्थ्य हे सर्वात मोठे असते,’ या विचाराने भाषणाची सुरुवात करत त्यांनी भारतीय संस्कृती आणि नारीशक्तीच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला. भारतात भूमीला मातृरूप मानले जाते. भारतीय संस्कृतीत नारीचा सन्मान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे. ही परंपरा ज्ञान आणि शास्त्राच्या भक्कम आधारावर उभी असल्याचे त्यांनी सांगितले.

भगवद्गीतेतील उल्लेखानुसार स्त्रियांमध्ये कीर्ती, श्री अर्थात लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा या सात गुणांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. या गुणांच्या माध्यमातून स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वातील सामर्थ्य अधोरेखित होते. आजच्या काळात या गुणांना प्रोत्साहन देऊन संघशक्ती निर्माण करणे आवश्यक आहे. पुढील पिढी वैभवशाली, चारित्र्यसंपन्न आणि सुसंस्कृत घडण्यासाठी संस्कारांचे महत्त्वही त्यांनी विशद केले.

नऊ कर्तृत्ववान महिलांचा गौरव

या सोहळ्यात श्रीमती ऊर्मिला नाथांनी, डॉ. मृदुला बेळे, श्रीमती मिताली कोळी, सौ. पूनम पाटील, डॉ. ऋषिका पटेल, सौ. श्रीमती कुलकर्णी, सौ. सोनाली तेलंग, सौ. रितू शर्मा आणि सौ. पल्लवी उटगी या नऊ महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शहर संपर्क प्रमुख विवेक सराफ यांनी प्रास्ताविक केले. सौ. ऐश्वर्या बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांचा परिचय डॉ. प्रीती कुलकर्णी, सौ. ज्योती वैद्य आणि आदित्य भातांबरेकर यांनी करून दिला. नवदुर्गांचा परिचय सौ. ऐश्वर्या कुलकर्णी, मिलिंद देशपांडे, उल्हास कुलकर्णी आणि गौतमी उपाध्ये यांनी करून दिला. पूर्वांचलातील विद्यार्थिनींनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…