अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांना केवळ उच्च शिक्षण देणे पुरेसे नसून, त्यांच्यावर योग्य संस्कार करणे ही पालकांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. शिक्षणाबरोबरच शिस्त, प्रामाणिकपणा, नम्रता, सामाजिक बांधिलकी आणि कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर या मूल्यांची जोपासना मुलांमध्ये झाली पाहिजे, असे प्रतिपादन महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांनी केले.
महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सभासदांची सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित दिवाळी भेटवस्तू वाटप व गुणवंत पाल्य गौरव समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप भाटे होते. यावेळी मार्गदर्शन करताना रमेश कुमार पवार म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध क्षेत्रांतील कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांनी दिलेले संस्कार यांचा मोठा वाटा असतो. पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता त्यांच्या आवडीनिवडी ओळखून त्यांना योग्य दिशा द्यावी. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरतो. पतसंस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. तसेच पतसंस्थेचे मयत कर्मचारी सुहास अन्नदाते यांच्या वारसांना संस्थेच्या वतीने एक लाख रुपयांचा मदत निधी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप भाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अभिजीत गावडे, अरविंद माळोदे व गणेश केंद्रे या सभासदांनी कामगार महासंघात प्रवेश केला. संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र डबीर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुलकर्णी, झोन अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण वाधावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश कुंभारे यांनी केले. सूत्रसंचालन हेमंत सूर्यवंशी यांनी केले, तर अमोल आभाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे पदाधिकारी, पतसंस्थेचे संचालक, सभासद, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव अनिल नजन, राहुल वरघंटे, गणेश वाडेकर, अरुण रासकर, अशोक पालवे, प्रदीप अडसूरे, गणेश सातपुते, अनिल टेकाळे, सुनील तरटे, मनोरमा कळंबे, आनंद कुलकर्णी व तुषार डबीर आदींनी विशेष प्रयत्न केले.


