मुंबई : राज्यात मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला असून उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.दरम्यान, विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.यंदा पावसाअभावी खरीप हंगामातील पेरणी काही प्रमाणात रखडली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांनाही वेग आला आहे.


