मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते गोरेगाव लोकल सेवा तब्बल ४५ दिवस बंद राहण्याची शक्यता असून, यामुळे लाखो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. मात्र, याबाबत रेल्वे प्रशासनाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमयूटीपी-२) प्रकल्पांतर्गत मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहावी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. या कामासाठी वांद्रे-खार उड्डाणपुलाची पुनर्बाधणी आवश्यक असल्याने रेल्वे प्रशासन ४५ दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. हा ब्लॉक लागू झाल्यास हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकल केवळ वांद्रेपर्यंतच धावतील, तर गोरेगावपर्यंतची सेवा तात्पुरती बंद राहू शकते.
दरम्यान, वांद्रे स्थानकात नवीन फलाट उभारण्याचाही प्रस्ताव असून, त्यामुळे भविष्यात अधिक लोकल फेऱ्या चालवणे शक्य होणार आहे. सहाव्या मार्गिकेच्या मुख्य कामासाठी निविदा प्रक्रिया ऑगस्ट २०२६मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नसला, तरी या संभाव्य बदलामुळे दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांचे लक्ष आता अधिकृत घोषणेकडे लागले आहे.


