नवी मुंबई , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : हिंदी ही कोणत्याही भारतीय भाषेची प्रतिस्पर्धी नसून सर्व भारतीय भाषांना जोडणारी सखी आहे. राजभाषेचा प्रसार करताना प्रादेशिक भाषांचा सन्मान आणि गौरव अबाधित ठेवणे हीच भारताच्या भाषिक वैविध्यातील एकात्मतेची खरी ताकद आहे, असा स्पष्ट संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे आयोजित हिंदी दिवस २०२६ आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात ते मार्गदर्शन करत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रभूमीवर हिंदी दिवसाचा राष्ट्रीय कार्यक्रम होत असल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्राच्यावतीने स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार, खासदार नरेश म्हस्के, राजभाषा विभागाच्या सचिव अंशूली आर्या, राजभाषा विभागाचे विशेष कार्य अधिकारी व्ही. एल. कांताराव, डॉ. मिलिंद प्रभाकर सबनीस, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचे वंशज जयदीप चटोपाध्याय यांच्यासह साहित्यिक, मान्यवर आणि राजभाषा पुरस्कार प्राप्त व्यक्ती उपस्थित होते.
मराठी आणि हिंदी या देवनागरी लिपीच्या माध्यमातून परस्परांशी घट्ट जोडलेल्या भाषा आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्या विचारांनी महाराष्ट्राला भक्तीचा मार्ग दाखवला आणि याच भक्ती चळवळीने संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधले, असे शिंदे यांनी सांगितले. संत नामदेवांच्या रचना पंजाबपर्यंत पोहोचल्या आणि गुरु ग्रंथसाहिबपर्यंत त्यांचा प्रभाव दिसतो, याचा दाखला देत भारतातील भाषांनी शतकानुशतके एकमेकींशी संवाद साधला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कबीर, तुलसीदास, मीराबाईपासून आधुनिक साहित्यापर्यंत हिंदीने भारतीय संस्कृती आणि विचारांची परंपरा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. राजभाषा हिंदीचा विस्तार हा कोणत्याही प्रांतीय भाषेचे स्थान घेण्यासाठी नसून सर्व भारतीय भाषांना सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी आहे. महाराष्ट्राने नेहमीच सर्व भाषांचा आणि संस्कृतींचा सन्मान केला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे; त्याचवेळी हिंदीलाही महाराष्ट्राने कायम मान-सन्मान दिला आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
ज्या भाषेची मुळे देशाच्या मातीत आहेत, त्या भाषांचा सरकारी कामकाजात अधिकाधिक वापर झाला पाहिजे. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सरकारी कामकाजात हिंदीच्या वापराला मोठी चालना मिळाली आहे. अमित शहा यांच्या गृह आणि सहकार मंत्रालयातील फाईल्स हिंदीत चालवल्या जात असल्याचा उल्लेख करत शिंदे यांनी त्यांच्या राजभाषेप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले. हिंदीचा वापर केवळ बोलचालीपुरता मर्यादित न राहता विज्ञान, तंत्रज्ञान, न्यायव्यवस्था, पोलीस आणि प्रशासनाच्या क्षेत्रातही वाढला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे नागरिक आणि शासन यांच्यातील संवाद अधिक सहज आणि प्रभावी होईल, असे ते म्हणाले. कलम ३७० हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत देशाची अखंडता अधिक बळकट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि अमित शहा यांच्या धाडसी निर्णयामुळे हे शक्य झाले, असे गौरवोद्गार एकनाथ शिंदे यांनी काढले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन आहे. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकासाला गती मिळत असून विकसित भारत २०४७च्या संकल्पनेत महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या उद्योग, व्यापार आणि सामाजिक जडणघडणीत हिंदी भाषिक नागरिकांचे योगदानही मोठे आहे. महाराष्ट्राच्या मातीत नाते जोडून राज्याच्या प्रगतीत खांद्याला खांदा लावून योगदान देणाऱ्या हिंदी भाषिक बांधवांनी राष्ट्राच्या प्रगतीतील आपले योगदान असेच सुरू ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. हिंदी दिवसाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती विशेष महत्त्वाची असल्याचे सांगताना शिंदे यांनी हिंदीच्या माध्यमातून देशातील विविध भाषिक समूहांना जोडण्याची आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना अधिक बळकट करण्याची दिशा या संमेलनातून मिळत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देत आपल्या भाषणाचा समारोप केला.


