माणुसकीला चालना देणारा मानवतावादी धर्म काळाची गरज : डॉ. राजा दीक्षित

पुणे , राजन शेळके (प्रतिनिधी) : आजच्या काळात धर्म हवा, पण धर्मांधता नको. धर्मस्वातंत्र्य हवे, मात्र ते धर्मनिरपेक्ष आणि राज्यघटनात्मक चौकटीत असावे. कर्मकांड, अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि उत्सवातिरेकाला बाजूला सारून माणुसकीला चालना देणारा मानवतावादी धर्म ही काळाची गरज आहे. मात्र, आज धर्म आणि हिंसा यांची होणारी सांगड अत्यंत दुर्दैवी असून, त्यातून निर्माण झालेले धार्मिक उन्माद आणि बहुसंख्यांकवादाचे वातावरण चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर धर्माची सकारात्मक, विधायक आणि प्रबोधनात्मक चर्चा होणे नितांत आवश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजा दीक्षित यांनी केले.

डायमंड पब्लिकेशन्स प्रकाशित आणि डॉ. नवनाथ रासकर व डॉ. सुनील राऊत संपादित ‘आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतन’ (विसावे शतक) या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (दि. ५) आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. राजा दीक्षित अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, ज्येष्ठ बुद्धिवादी विचारवंत डॉ. प्रदीप गोखले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. हरीश नवले आणि डायमंड पब्लिकेशन्सचे संचालक दत्तात्रेय पाष्टे मंचावर उपस्थित होते.

डॉ. राजा दीक्षित पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म आणि धम्म यातील भेद स्पष्ट करताना धम्माची जी मांडणी केली, ती आजही मार्गदर्शक आहे. आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतनाचा विचार करताना केवळ विसाव्या शतकाचाच नव्हे, तर एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील मौलिक प्रबोधनाचा पायाही लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच स्त्रीवादी धर्मचिकित्सा या आव्हानात्मक पैलूवर विचार होणे हीदेखील काळाची गरज आहे. वैचारिक स्तरावर अशा पुस्तकांचे प्रकाशन करून त्यावर खुली चर्चा घडवून आणल्यास समाजात निकोप आणि सकारात्मक दृष्टी निर्माण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

शिवधर्माच्या उल्लेखाशिवाय इतिहास अपूर्ण : डॉ. सदानंद मोरे

धर्माचा अभ्यास करताना अंतर्गत, पर्यायी आणि तटस्थ अशा तिन्ही पद्धतींनी सर्वच धर्मांची चिकित्सा होणे अपेक्षित आहे, असे मत व्यक्त करून डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, आधुनिक काळात धर्माकडे कसे पाहिले पाहिजे, याचा अभ्यास करताना लोकमान्य टिळक यांच्या विचारांतून धर्मचिंतनाची परंपरा कशी विकसित होत गेली, यावर मंथन होणे गरजेचे आहे.

धर्मचिकित्सा, मार्क्सवाद आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा धर्मावरील प्रभाव याविषयी मत व्यक्त करताना डॉ. मोरे म्हणाले की, लोकमान्य टिळक यांनी अपरंपरागत आणि परंपरेच्या विरोधात जाणारा अर्थ मांडून धर्मचिंतनाला नवी दिशा दिली. धर्मचिकित्सा करताना मार्क्सवाद हाही एक धर्म बनल्याचे दिसून येते. त्यामुळे मार्क्सवादाला निरीश्वरवादी धर्म म्हणून मांडता येते. त्याचप्रमाणे आज तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर धार्मिक क्षेत्रात कशा प्रकारे होत आहे, याच्याही नोंदी ठेवणे आवश्यक आहे.

धर्म कालबाह्य झाला आहे, असा गैरसमज न करता धर्मासंबंधी जागरूक राहून त्याची निकोप चिकित्सा करणे ही समकालीन काळाची गरज आहे. विसाव्या शतकातील धर्मचिंतनाचा इतिहास मांडताना शिवधर्माचा उल्लेख केल्याशिवाय तो पूर्ण होऊ शकणार नाही, असेही डॉ. सदानंद मोरे यांनी स्पष्ट केले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मराठवाड़ा की प्यास बुझाएगा 20 हजार करोड़ का वॉटर ग्रिड!

मराठवाड़ा का नाम सामने आते ही सबसे पहले पानी की किल्लत और सूखे की तस्वीर सामने आती है। सालों से यहां के लोग पानी की समस्या से जूझ रहे हैं।…

रोटरी क्लब अहिल्यानगरचा ‘स्वर दीपावली’ कार्यक्रम दिमाखात संपन्न!

अहिल्यानगर,राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यावसायिक युगात माणसामाणसांमधील दुरावा वाढत असताना, रोटरी क्लब अहिल्यानगरच्या वतीने आयोजित ‘स्वर दीपावली’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आपलेपणा, जिव्हाळा आणि माणुसकीचा अनोखा अनुभव देणारा…