नांदेड : आगामी गणेशोत्सव व श्री विसर्जन सोहळा सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शहरातील प्रमुख पाच विसर्जनस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी उपमहापौर दिपकसिंह रावत, महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. आसना नदी परिसरातील पासदगाव व सांगवी येथे कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाच्या कामांचा विशेष आढावा घेण्यात आला. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती आणि आवश्यक सोयी-सुविधा वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुयनी व झरी खदान परिसरात मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाचीही पाहणी करण्यात आली. मोठ्या मूर्तींचे विसर्जन सुरक्षितपणे व्हावे यासाठी रॅम्प, क्रेन आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच गोदावरी नदीवरील मुख्य नावघाट विसर्जनस्थळाची पाहणी करून घाटांची स्वच्छता, डागडुजी आणि मार्गांच्या दुरुस्तीचा आढावा घेण्यात आला.
विसर्जनाच्या दिवशी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके पूर्णपणे सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व घाटांवर जीवरक्षक व रुग्णवाहिका तैनात राहणार आहेत. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पाणी, तात्पुरते मंडप, बॅरिकेडिंग आणि विद्युत व्यवस्था यांसह आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी नागरिकांना घाट व खदान परिसरात विनाकारण गर्दी न करता प्रशासनाच्या सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्याशी समन्वय ठेवून विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी कमी पर्जन्यमानामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्याचे सांगत गणेश मंडळे आणि घरगुती गणपती विसर्जन करणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या यंत्रणेला तसेच कृत्रिम तलावांच्या वापराला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
उपस्थित अधिकारी : अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त गंगाधर इरलोड, उपायुक्त स. अजितपालसिंग संधु, शहर अभियंता सुमंत पाटील, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादिक, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, संघरत्न सोनसळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत रिट्ठे, क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग, रावण सोनसळे, राजेश जाधव, नागनाथ पतंगे, गौतम कवडे, विठ्ठल तिडके, उपअभियंता खुशाल कदम, सतीश ढवळे, अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे आदी उपस्थित होते.


