मुंबई, राज माहोरे (प्रतिनिधि) : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर प्रेम करा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
बोरिवली येथील कोरा केंद्र ग्राउंडवर २० हजार हिंदी भाषिक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षणाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी शिंदे बोलत होते. रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकल्याचे पाहून आनंद व्यक्त करत शिंदे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी साहित्यिक, भाषातज्ज्ञ, प्राचार्य, शिक्षक आणि मराठीप्रेमींना सोबत घेऊन हे काम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. “मराठी भाषा तोडणारी नाही, जोडणारी आहे. रिक्षा-टॅक्सीमध्ये प्रवाशाला ‘कुठे जायचे?’ एवढेच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकाला ‘हळू उतरा’ असे प्रेमाने म्हणता आले पाहिजे. प्रवाशांनीही चालकांशी मराठीत संवाद साधावा. त्यामुळे मराठीचा प्रचार-प्रसार वाढेल आणि चालकांचा व्यवसायही वाढेल,” असे शिंदे म्हणाले. आपणही सुरुवातीच्या काळात रिक्षा चालवली असल्याचे सांगत त्यांनी रिक्षा-टॅक्सी सेवा ही सेवाच असल्याचे नमूद केले. कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, असे आवाहन करत प्रवाशांचे पैसे, दागिने किंवा मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर पोलिसांकडे जमा करणाऱ्या प्रामाणिक चालकांचे त्यांनी कौतुक केले.
मुंबईत राहणारा आणि मराठीवर प्रेम करणारा प्रत्येक मुंबईकर हा आपला नातेवाईक, मित्र आणि आपला माणूस आहे, अशी भावना ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. मराठी शिकविणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ६० हजार जणांनी मराठी भाषा शिकली असून, त्याचा अभिमान बाळगावा. इतरांनीही मराठी शिकून तिचा प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. “मुंबई रोजीरोटी देणारी आहे; मुंबईवर आणि मराठीवर प्रेम करा,” असे सांगत त्यांनी सर्वांना सोबत घेऊन मुंबईचा विकास करण्याचे आवाहन केले. गोविंदा उत्सव आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करून संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मुरजी पटेल, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्यासह शिवसेनेचे खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रिक्षा-टॅक्सी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


