अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संरक्षण आणि धार्मिक परंपरांचे जतन करण्यासाठी नागरिकांनी शाडू माती तसेच गाईच्या शेणापासून (गोमयापासून) तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना करावी, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र गोरक्षण प्रमुख संतोष खामकर यांनी नागरिकांना हे आवाहन केले. गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलस्रोतांचे प्रदूषण होऊ नये, तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शाडू माती तसेच गोमयापासून तयार केलेल्या मूर्ती पर्यावरणपूरक असून, त्यांच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण कमी करण्यास मदत होते. त्यामुळे गणेशभक्तांनी पारंपरिक श्रद्धा जपत पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य द्यावे, असे खामकर यांनी नमूद केले.
गणेशोत्सव हा भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देऊन ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संतोष खामकर यांनी केले.


