नांदेड , रविंद्र औंढेकर( जिल्हा प्रतिनिधी ) : आज श्री गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, मंगलमय आरती, फुलांची सजावट आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने घराघरांत आनंद, श्रद्धा आणि चैतन्याचे पर्व सुरू झाले.
नांदेड येथील छायाचित्रकार विजय होकर्णे यांच्या परिवाराच्या निवासस्थानीही श्री गणेश प्रतिष्ठापनेचा सोहळा मोठ्या उत्साहात, वाजत-गाजत आणि भक्तिभावाने पार पडला. पारंपरिक पद्धतीने गणरायाचे स्वागत करून विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी परिवारातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गणरायाच्या आगमनाने घरातील वातावरण भक्तिमय झाले असून, सुख, समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील सर्वांच्या मंगलमय जीवनासाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून, तो आपल्या संस्कृतीशी, श्रद्धेशी आणि कौटुंबिक एकोप्याशी जोडलेला जिव्हाळ्याचा सण आहे. पिढ्यान्पिढ्या जपल्या जाणाऱ्या परंपरांमधून भक्तीची संस्कारमूल्ये पुढे जातात. गणरायाच्या मूर्तीसमोर लावलेला दिवा, अर्पण केलेली फुले, उच्चारले जाणारे मंत्र आणि सामूहिक आरतीचा स्वर यांतून घराघरांत श्रद्धेचा प्रकाश उजळतो.
श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सार्वजनिक मंडळांमध्येही विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणरायाच्या आगमनाने समाजात एकोपा, परस्पर प्रेम आणि सकारात्मकतेची भावना वृद्धिंगत होत आहे. विघ्नहर्ता श्री गणराय सर्वांच्या जीवनातील संकटे दूर करून सुख-शांती, समाधान आणि समृद्धी प्रदान करो, अशी भक्तिभावपूर्ण प्रार्थना यानिमित्ताने करण्यात आली.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!


