बारामती : माणुसकी आणि संवेदनशीलतेचा प्रत्यय देणारी घटना बारामतीत समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गुरुवारी सकाळी बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यासमोर रस्त्यावर एका तरुणीचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले.
घटना लक्षात येताच सुनेत्रा पवार यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्त तरुणीकडे धाव घेत तिची विचारपूस केली. त्यांनी जखमी तरुणीच्या प्रकृतीची माहिती घेत संबंधित अधिकारी आणि सहकाऱ्यांना त्वरित मदत करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर जखमी तरुणीला वेळ न दवडता रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली. उपचार प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक सूचना देखील देण्यात आल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांनी आपले स्वीय सहायक सुनील कुमार मुसळे यांना संबंधित तरुणीसोबत रुग्णालयात जाण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे अपघातग्रस्त तरुणीला तातडीची मदत मिळू शकली.
दरम्यान, संकटाच्या प्रसंगी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि माणुसकीची भूमिका यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या या कृतीची चर्चा झाली. सार्वजनिक जीवनात काम करताना केवळ प्रशासनिक जबाबदारीच नव्हे, तर मानवी संवेदनाही तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे या घटनेतून दिसून आले.


