पुण्यात आजपासून १४ दिवस जमावबंदी; सोशल मीडियावरील रील्सवरही पोलिसांची नजर

पाच किंवा अधिक जणांचा जमाव, विनापरवानगी मिरवणुका आणि आक्षेपार्ह भाषणांवर बंदी; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

पुणे : पुणे शहरात आज, १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. ३१ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. आगामी सण आणि विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१), (२), (३) अन्वये हे आदेश लागू केले आहेत. ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणांच्या पार्श्वभूमीवर तसेच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद आणि उपोषणासारखी आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याच काळात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईमुळेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सोशल मीडिया रील्सवरही कारवाई

या जमावबंदीच्या काळात केवळ प्रत्यक्ष जमाव आणि मिरवणुकांवरच निर्बंध नसून सोशल मीडियावरील काही प्रकारच्या कंटेंटवरही पोलिसांची नजर राहणार आहे. गुन्हेगारांचे व्हिडिओ किंवा रील्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करणे, त्यातून दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणे यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय जातीय सलोखा बिघडवणारी भाषणे, आक्षेपार्ह घोषणा, गाणी तसेच वादग्रस्त फलक किंवा चित्रे तयार करून त्यांचे प्रदर्शन करण्यासही मनाई आहे.

नेमकं काय बंद?

या काळात शस्त्रे, लाठ्या, तलवारी, दाहक किंवा स्फोटक पदार्थ तसेच दगड किंवा फेकण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू जमा करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीचे चित्र, प्रतिमा किंवा प्रतीकात्मक प्रेताचे प्रदर्शन आणि दहन करण्यासही बंदी राहणार आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, सभा घेणे किंवा पोलिसांची परवानगी न घेता मिरवणूक काढणे यावरही निर्बंध आहेत.

नियम मोडल्यास कारवाई

शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तींना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच ३.५ फुटांपर्यंतची काठी बाळगणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षकांनाही काही अटींसह सूट देण्यात आली आहे. मात्र, सामान्य नागरिकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ अंतर्गत कायदेशीर कारवाई, दंड किंवा शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. पुणेकरांनी पुढील १४ दिवस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा : जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर, रवींद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत…

संत रविदास महाराजांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त ‘समरसता संकल्प अभियान’

कांदिवली पूर्व, राम शेंडे ( प्रतिनिधी ) : संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत निघालेल्या कलश वंदन…